वाई – व्याहळी (ता. वाई) येथील भूमापन सर्व्हे नं. 90 मध्ये मूळ रस्ता सोडून, खातेदारांच्या दबावामुळे इतर ठिकाणी रस्ता काढला जात आहे. याबाबत महसूल विभाग व पोलिसांकडे तक्रार केली असता, आमच्यावरच गुन्हे दाखल करण्याची भाषा केली जात आहे. त्यामुळे आम्हाला आत्महदन करण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी गावातील थोरवे कुटुंबीयांनी वाईत प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर बुधवारी आंदोलन केले.
याबाबत माहिती अशी, व्याहळी येथील भूमापन सर्व्हे नं. 90 च्या नकाशातील मूळ सरकारी रस्ता सोडून, स्थानिक लोक आणि त्या सर्व्हे नंबरमधील खातेदारांच्या दबावामुळे प्रशासन मनमानी पद्धतीने रस्ते काढू इच्छित आहेत. त्यास विक्रम साहेबराव थोरवे, सौ. मोनिका विक्रम थोरवे व कुटुंबीयांनी हरकत घेतली असता, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची भाषा केली जात आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेर बुधवारी कुटुंबीयांनी आंदोलन केले.