मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीची सोमावारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. 288 विधानसभा सदस्यत्वासाठी सुमारे 8 कोटी 90 लाख मतदार आपला हक्क बजवतील. त्यातील 53 जागा आरक्षित आहेत. यात 4 कोटी 50 लाख पुरूष मतदार आहेत.
एकूण तीन हजार 237 उमेदवार आपले नशीब अजमावतील. त्यात 235 महिलांचा समावेश होता. राज्यातील मतदानासाठी 96 हजार 661 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. नांदेड दक्षिण मतदार संघात सर्वाधिक म्हणजे तब्बल 38 उमेदवार रिंगणात आहेत.
भाजपाचे माजी नेते आणि कॉंग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघात लढत देतील. फडणवीस यांनी आपल्या घरच्या मैदानावर केवळ दोन सभा घेतल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीचा आणि बेरोजगारीच्या तरूणांतील असंतोषाचा आपल्याला लाभ होईल अशी अटकळ देशमुख व्यक्त करत आहेत.
भाजपाचे आणखी एक दिग्गज उमेदवार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली टोपी कोथरूड मतदारसंघातून मैदानात टाकली आहे. त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे यांनी आव्हान दिले आहे. स्थानिक विरूध्द परका असे प्रचाराचे स्वरूप येथे विरोधकांकडून राबवले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपाचे अतुलबाबा सुरेश चव्हाण यांच्यात लढत आहे. तेथे 11 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. फडणवीस सरकारच्या विकासकामांच्या आधारे कॉंग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्यात कमळ फुलवण्याचा भाजपाचा मनसुबा आहे. तेथे माजी आमदार विलासराव उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह उंडाळकर पाटील रिंगणात असल्याने तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या मध्य मुंबईतील वरळीतून लढत देत आहेत. कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण नांदेडमधील भोकर मतदारसंघातून आपले नशिब अजमावत आहेत. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीळकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती सोलापूर मध्यमधून मैदानात आहेत. कणकवलीतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश सेनेच्या उमेदवाराचा सामना करतील. ही लढत दोन्ही पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा या मुक्ताईनगरमधून लढत आहेत.
गोपिनाथ मुंडे यांची कन्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा आणि त्यांचे चुलत बंधू विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील लढत उत्कंठावर्धक आहे. तर शरद पावार यांचे नातू रोहित पवार हे भाजपाचे मंत्री राम शिंदे यांच्याशी कर्जत मतदार संघात कडवी लढत देत आहेत. तर अजित पावार हे बारामतीतून लढत आहेत. त्यांना भाजपाचे पडळकर यांनी आव्हान दिले आहे,
भारतीय जनता पक्ष आपल्या काही सहकारी पक्षांच्या उमेदवारांसह 164 जागांवर लढत आहे. शिवसेनेचे उमेदवार 124 आहेत. कांग्रेसने 144 जागी मैदानात असून राष्ट्रवादी 121 जागी मैदानात आहे. राज ठाकरे यांची मनसेने 101 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. सीपीआय 16 तर सीपीएम 8 जागी मैदानात आहे. तर 1400 अपक्ष मैदानात आहेत.