मावळात शांततेत मतदान

रोमांचक लढत :  मतदानाच्या टक्‍केवारीत अल्पशी वाढ

वडगाव मावळ – मावळ विधानसभेच्या सात जागांसाठी सोमवारी (दि. 21) मतदान झाले. विविध पक्षांच्या दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज “इव्हीएम’मध्ये बंद झाले. त्यामुळे विधानसभा 2019 च्या निवडणुकीत पक्षांतरासह अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. मावळात 2014 च्या तुलनेत यावेळची मतदानाची टक्‍केवारी 71.20 वरून 69.70 टक्‍क्‍यांवर घसरगुंडी झाली आहे.

गेली 25 वर्षे भारतीय जनता पक्षाचा गड म्हणून मावळ तालुक्‍याला संबोधले जाते. भाजपची उमेदवारी बदलावरून खल निर्माण झाली असतानाच राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपकडून प्रबळ इच्छुक उमेदवार सुनील शेळके यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये डेरेदाखल होत उमेदवारी मिळविली. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी अशी प्रमुख लढत रंगली. महायुतीचे उमेदवार, राज्यमंत्री बाळा भेगडे यांना विजयाची खात्री असल्याचे सांगितले. तर मावळ विधानसभेची निवडणूक ही मतदारांनी हातात घेतली असून, केवळ विजयावर शिक्‍कामोर्तब होणे बाकी आहे, असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील शेळके यांना व्यक्त केला आहे.

या निवडणुकीमध्ये सुनील शेळके (राष्ट्रवादी कॉंग्रेस), बाळा ऊर्फ संजय भेगडे (भारतीय जनता पार्टी), मंदाकिनी भोसले (बहुजन समाज पार्टी), धर्मपाल तंतरपाळे (अपक्ष), ऍड. खंडूजी तिकोणे (अपक्ष), मुकेश अगरवाल (अपक्ष), रमेश ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) या उमेदवारांत लढत झाली.

भेगडे, शेळकेंसह सात उमेदवारांचे भवितव्य “इव्हीएम’मध्ये बंद
मावळ विधानसभेच्या सात जागांसाठी सोमवारी (दि. 21) शांततामय वातावरणात मतदान झाले. विविध पक्षांच्या दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज “इव्हीएम’मध्ये बंद झाले. त्यामुळे विधानसभा 2019 च्या निवडणुकीत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. मावळात 2014 च्या तुलनेत यावेळी मतदानाच्या टक्‍केवारीत अल्पशी वाढ 71.27 झाली आहे.

कार्ला परिसरात 73.48 टक्‍के

परिसरात सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात झाली. सकळी नऊनंतर दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाचा आपला हक्‍क बजावण्यासाठी कार्ला येथील दोन मतदान केंद्रावर लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या.सकाळी अकरा ते दोनच्या वेळेत महिलांची मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच कार्ला येथे भारतीय नागरिकत्व स्वीकारलेल्या विदेशी नागरिकांनी देखील मतदानाचा हक्‍क बजावला. चारनंतर पुन्हा एकदा मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्ला येथे दोन मतदान केंद्र असून, 127 मतदान केंद्रावर एकूण 1092 मतदारापैकी पुरुष 427 व महिला 397 एकूण 824 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला, तर केंद्र क्र. 128 वर एकूण 921 मतदार असून, पुरुष 348, तर महिला 306 एकूण 654 अशा प्रकारे कार्ला येथे 2013 मतदानापैकी 1478 मतदान झाले. या वेळी नवयुवक मोठ्या उत्साहाने मतदान करण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे लोकसभेपेक्षा कार्ल्यात 177 मतदान जास्त झाले आहे. मतदान झोनल अधिकारी एस. एल. कवाटगी, उपअधिकारी लाऊटे यांनी काम पाहिले. केंद्रस्तरीय अधिकारी दिलीप पोटे, उमेश इंगूळकर, पोलीस पाटील संजय जाधव हे मतदारांना व्होटर स्लिप देऊन मदत करत होते. कार्ला परिसरातील पाटण येथे मतदान 855, मळवली मतदान 602, भाजे दोन केंद्रात मतदान 1003, टाकवे 754, वेहरगाव 996, दहिवली 671, देवले येथे 946, शिलाटणे 1054 अशाप्रकारे मतदान झाले.

लोणावळा शहरात शांततेत मतदान

शहरात झालेल्या मतदानात लोणावळेकर नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे उत्साहात आणि शांततेत आपला मतदानाचा हक्‍क बजावला. मावळ विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने भाजपकडून विद्यमान आमदार, राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीकडून सुनील शेळके या दोन उमेदवारांमध्ये तुल्यबळ अशी लढत होत आहे. संपूर्ण राज्यातील “हाय व्होल्टेज’ लढतीपैकी ही एक लढत मानली जात आहे. लोणावळा शहरात एकूण 44 हजार मतदार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या शहराकडे विशेष लक्ष दिले होते. लोणावळा शहरात अनेक मतदान केंद्रावर अगदी सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांच्या रांगा बघायला मिळत होत्या. त्यातही तरुण वर्गाचा समावेश जास्त दिसत होता. सर्वच राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रावर घेऊन येण्याची लगबग दृष्टीला पडत होती.

हीच परिस्थिती शहराच्या अजूबाजूच्या ग्रामीण भागातही दिसत होती. शहरात मतदान शांततेत सुरू असताना काही केंद्रावर काही मतदारांची नाव याद्यांमध्ये नसल्याने किंवा मतदान केंद्र बदलले असल्याच्या तक्रारीमुळे मतदारांसह कार्यकर्त्यांची तसेच अधिकाऱ्यांची गडबड उडत होती, तुरळक ठिकाणी वादावादीचे प्रसंग देखील घडत होते. शहरातील बहुतेक मतदान केंद्रावर सायंकाळी 6 ते 6.30 पूर्वी मतदान संपले होते; मात्र भुशी, रामनगर मतदान केंद्रावर 6 वाजल्यानंतर देखील 150 ते 200 मतदार रांगेत उभे राहिल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते.

आंदर मावळात मतदानात वाढ

आंदर मावळ मधील ग्रामीण भागातील नागरिकांनी मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. टाकवे, फळणे, वडेश्‍वर, वहाणगाव, भोयरे या परिसरातील युवक, महिला, वयोवृद्ध नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्‍क बाजावला. दोन दिवस पडलेल्या पावसाने आज पूर्णपणे विश्रांती घेतल्याने मतदानाचा टक्‍का वाढण्यास अधिक मदत झाली. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था प्रशासनाने केली होती. मतदान केंद्राच्या बाहेर नवमतदार तसेच वयोवृद्ध नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.