इस्लामाबाद – पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये आज प्रांतीय विधीमंडळासाठी मतदान घेण्यात आले. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील एकूण 32 लाख पात्र मतदारांनी आज मतदान केले.
गीलगीट-बाल्टिस्तानमध्ये निवडणूका घेण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर भारताने पूर्वी जोरदार टीका केली होती. हा भाग पाकिस्तानने लष्करी बळाने बळकावलेला असल्याने तेथील निवडणूकांना कोणताही कायदेशीर आधार नाही, असे भारताने म्हटले आहे.
आजच्या निवडणूकीसाठी पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ, पाकिस्तान मुस्लिम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत आहे. पीटीआय पक्षाने सर्व 45 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर पीएमएल-एन आणि पीपीपीो या पक्षांनी प्रत्येकी 44 जणांना उमेदवारी दिली आहे.
तेहरिक ए लबाईक पाकिस्तान या कट्टरवादी इस्लामी पक्षानेही या निवडणूकीत 40 उमेदवार उभे केले आहेत. या पक्षाच्या हिंसक कारवायांमुळे पाकिस्तान सरकारने या पक्षावर एप्रिल महिन्यात बंदी घातली आहे. मात्र तरिही निवडणूक आयोगाने या पक्षाची नोंदणी रद्द केलेली नाही आणि निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांव्यतिरिक्त एकूण 261 अपक्ष उमेदवार देखील या निवडणूकीला उभे आहेत.
आतापर्यंतच्या इतिहासानुसार पाकिस्तानमधील सत्तारुढ पक्षच पाक व्याप्त काश्मीरमधील निवडणूका जिंकत आला आहे. यापूर्वी पाक व्याप्त काश्मीरमध्ये 2016 साली प्रांतीय विधीमंडळाची निवडणूक झाली होती.
त्या निवडणूकीत माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्तिम लीग पक्षाने विजय मिळवला होता. गॅलअप पाकिस्तान या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 44 टक्के लोकांचा पाठिंबा पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाला तर 12 टक्के लोकांचा पाठिंबा फरीफ यांच्या पक्षाला आहे.
33 मतदार संघ आणि निर्वासितांसाठ 12 जागा
पाक व्याप्त काश्मीरला पाकिस्तानला “आझाद काश्मीर’ म्हणून संबोधले जाते. या विधीमंडळाची मुदत अन्य प्रांतीय विधीमंडळांप्रमाणेच 5 वर्षांची असणार आहे. पाक व्याप्त काश्मीरच्या विधानभेमध्ये एकूण 53 सदस्य आहेत. मात्र 45 सदस्यांसाठी आजची निवडणूक घेण्यात आली. उर्वरित 5 जागा महिलांसाठी राखीव आहेत. तीन जागांवर नामनिर्देशित उमेदवारांची नियुक्ती केली जाते. पीओकेमध्ये विधानसभेचे 33 मतदारसंघ आहेत. तर 12 जागा पाकिस्तानातील विविध शहरांमध्ये स्थायिक झालेल्या निर्वासितांसाठी राखीव आहेत.