मतदारांना लवकरच मिळणार ‘डिजिटल’ ओळखपत्र?

नवी दिल्ली – देशातील मतदारांना डिजिटल ओळखपत्र देण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे. तथापि, याविषयी अजून कोणताहीं निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मतदारांना अशा स्वरूपाच्या ओळखपत्रांची गरज आहे असा फीडबॅक आम्हाला आमच्या ग्राऊंड वर्किंग ग्रुपकडून मिळाला आहे. डिजिटल मतदार ओळखपत्रे म्हणजे मतदारांना त्यांच्या मोबाइल फोनवरून दिली जाऊ शकतील अशी ओळखपत्रे अशी संकल्पना आहे काय, असे विचारता या अधिकाऱ्याने सांगितले अशा स्वरूपाच्या ओळखपत्रांचा नेमका आराखडा मान्य झाला की त्याचा तपशील देणे शक्‍य होईल.

तथापि हे ओळखपत्र आपल्या नेहमीच्या स्वरूपातील ओळखपत्र नसेल ते आपल्या वेबसाइटवर, मोबाइल किंवा ई-मेलवरील उपलब्ध असेल असा आमचा प्रयत्न आहे. सामान्य मतदारांना ते पटकन जारी करता आले पाहिजे आणि त्या ओळखपत्रांचा वापर त्यांना अत्यंत सहजतेने करता आला पाहिजे असा प्रयत्न यातून केला जाणार आहे. सध्या आधारकार्ड, पॅन नंबर आणि वाहन चालकाचा परवाना डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.