शिरूर तालुक्यात निरूत्साह
न्हावरे- पदवीधर मतदारसंघात नाव नोंदणीसाठी शुक्रवारी (दि.1) पर्यंत शिरूर तालुक्यातील 74 पदवीधरांनी व शिक्षक मतदारसंघात फक्त 31 शिक्षकांनीच नाव नोंदणीसाठी अर्ज भरून दिले आहेत, अशी माहिती शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी दिली. पुणे विभागात शिक्षक व पदवीधर मतदारसंघात मतदार नाव नोंदणीसाठी दि. 1 ऑक्टोबरला कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र, पदवीधर व शिक्षकांनी नाव नोंदणीसाठी निरुत्साह दाखवला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दोन्हीही मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदणीसाठी दि. 6 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. शिरूर तालुक्यातील पात्र व्यक्तींनी मोठ्या संख्येने कागदपत्रांसह अर्ज भरून मतदार नाव नोंदणीसाठी शिरूर तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेत अर्ज जमा करावेत, असे आवाहन शिरूरच्या तहसीलदारांनी केले आहे.
सलग झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे संबंधित मतदारांमध्ये पदवीधर व शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी निरुत्साह जाणवत आहे. प्रत्येक वेळेस नव्याने नाव नोंदणी करावी लागत असल्यामुळे अनेक पदवीधर व शिक्षकांनी याकडे पाठ फिरवली आहे.