Voter list – महाराष्ट्रात 4,12,416 मतदारांची निव्वळ भर पडली असून 18 ते 29 वयोगटातील मतदारांचे प्रमाण ऑक्टोबर 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत सुमारे एक टक्क्याने वाढले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होणार आहेत.
राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम राबवून मतदार याद्यांचे विशेष सारांश पुनरिक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती. या कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या प्रयत्नांमुळे अंतिम मतदार यादीतील नवीन मतदारांची टक्केवारी लक्षणीयरीत्या वाढली आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
अधिकृत आकडेवारीनुसार राज्यातील एकूण पात्र मतदारांची संख्या सुमारे 9.12 कोटी आहे. 18 ते 29 वयोगटातील मतदारांमध्ये सुमारे एक टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर 40 ते 80 वयोगटातील मतदारांची संख्या प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी झाली आहे. 24,33,766 मतदारांची नावे नोंदणीकृत करण्यात आली असून 20,21,350 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यामुळे 4,12,416 मतदारांची निव्वळ वाढ झाली असून अंतिम मतदार यादीतील एकूण मतदारांची संख्या 9,12,44,679वर पोहोचली आहे, असे देशपांडे म्हणाले.
पुरुष मतदारांची संख्या 1,01,869 ने, महिला मतदारांची संख्या 3,08,306 ने आणि तृतीय पंथीय मतदारांची संख्या 572 ने वाढली. मतदार यादीत दर 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या 917 वरून 922 पर्यंत वाढली आहे. 18 ते 19 वयोगटातील तब्बल 6,70,302 मतदार जोडले गेले आणि 20 ते 29 वयोगटातील 8,33,496 मतदार जोडले गेले.
या यादीतील एकूण 11,60,696 मृत मतदार हटवण्यात आले आहे. त्यापैकी ४,९२,३९५ जण हे ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. त्याचप्रमाणे, समान छायाचित्र असलेले 9,05,559 मतदारही यादीत आढळून आले आणि पूर्ण छाननीनंतर 2,84,620 मतदारांची नावे वगळण्यात आली, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.