नवी दिल्ली – दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या मरकज कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या तबलिघी जामातच्या 960 विदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून त्यांना गृहमंत्रालयाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. त्यात अमेरिकेतील चार, ब्रिटनमधील नऊ, चीनमधील सहा नागरिकांचाही समावेश आहे.
या कार्यक्रमासाठी आलेल्या विदेशी नागरिकांपैकी इंडोनेशियातील 379, बांगलादेशातील 110, म्यानमार मधील 63 आणि श्रीलंकेतील 33 नागरिक अजूनही भारतातच असून त्यांच्यापैकी अनेकांना करोना झाला आहे.
ज्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत त्यात किरगीजस्तानचे 77, मलेशियाचे 75, थायलंडचे 65, व्हिएतनामचे 12, सौदी अरेबियाचे 9, फ्रांसचे 3, नागरिक आहेत. देशात लॉकडाऊन जाहींर झालेला असताना सुद्धा निजामुद्दीनच्या या इस्लामिक संस्थेच्या मुख्यालयात 2300 नागरीक थांबून होते. त्यात 250 विदेशी नागरिक होते.
आता त्या सर्वांना तेथून हलवण्यात आले असले तरी ते तेथे एकमेकांच्या संपर्कात राहिल्याने त्यांना अन्यत्र हलवून क्वारंटाईन करण्यात आले आहे. तबलिघी जामातचे एकूण तिनशे जण करोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. गेल्या महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या या मरकज कार्यक्रमात एकूण नऊ हजार जणांनी भाग घेतला होता.