दगडफेकीला न घाबरता डॉक्‍टर पुन्हा कामावर रूजू

भोपाळ- संतप्त जमावाच्या हिंसाचाराचा सामना केल्यानंतर मनात कुठलीही भीती न बाळगता इंदूरमधील डॉक्‍टर पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी जे करणे आवश्‍यक आहे, ती सर्व कामे त्यांनी चालू केली आहेत.

आम्हाला घाबरुन चालणार नाही, ते आम्हाला परवडू शकत नाही, असे डॉक्‍टर झाकीया म्हणाल्या. जमावाने ज्या भागात त्यांच्या टीमवर दगडफेक केली, तिथे त्यांनी पुन्हा काम सुरु केले असल्याचे वृत्त आहे. लोकांना त्रास सहन करावा लागतोय. करोना बाधितांना शोधून काढणे आवश्‍यक आहे, असे त्या म्हणाल्या. मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी सात जणांना अटक केली असून चौघांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा काद्यातंर्गत कारवाई केली आहे अशी माहिती डीआयजी हरीनारायणचारी मिश्रा यांनी दिली. अन्य आरोपींना व्हिडीओ फुटेजच्या माध्यमातून शोधून काढू असे त्यांनी सांगितले.

इंदूरच्या टाट पट्टी बाखल भागात करोना व्हायरस संदर्भात नागरिकांची तपासणी सुरु असताना आरोग्य विभागाच्या पथकाला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. संतप्त झालेल्या स्थानिकांनी आरोग्य विभागाच्या पथकावरच थेट दगडफेक केली होती. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

सुदैवाने आरोग्य विभागाचे पथक थोडक्‍यात या दगडफेकीतून बचावले. या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या भागात मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. दगडफेकीच्या या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.