पुणे – देशामध्ये महामार्गांवर अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. या मार्गावरील अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने “व्हिजन झीरो’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
पुणे ते मुंबई महामार्गावर (एनएच 48) राबविण्यात येणाऱ्या “व्हिजन झीरो’ या उपक्रमाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र पोलीस आणि सार्वजनिक आरोग्य खाते यांच्या माध्यमातून सेव्हलाइफ फाउंडेशन आणि फोक्सवॅगन ग्रुप ऑफ इंडिया यांच्याशी करार केला आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. एल. मोपलवार, फोक्सवॅगनचे गुरुप्रताप बोपराय आणि सेव्हलाइफ फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयुष तिवारी आदी उपस्थित होते.
महामार्गांवरील अपघात पूर्णत: घटविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहे. त्यामध्ये रस्ते इंजिनिअरिंगचे उपाय, अपघातानंतर दिल्या जाणाऱ्या आपत्कालीन सेवेत सुधारणा, सर्वसमावेशक संशोधन आणि पोलिसांचे अधिक मनुष्यबळ उपलब्ध करणे आदी बाबींचा समावेश करण्यात येणार आहे. रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 35 टक्के मृत्यू महामार्गांवर होतात. रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी “व्हिजन झीरो’ची मदत होणार आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी व्यवस्थात्मक सुधारणा करण्याच्या कामाला जनजागृती मोहिमांची जोड दिली जाणार आहे. या 111 किलोमीटरसाठी महामार्ग आपत्कालीन सेवा तातडीने पुरविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली जाईल, असे मोपलवार म्हणाले.