हिंजवडी -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते माजी शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदेश कार्यालय मुंबई येथे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष व प्रवक्ते रविकांत वरपे आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रदेशच्या नियुक्तीबद्दल बोलताना विशाल वाकडकर म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील अनेक प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी आंदोलने केली. प्रदेश पातळीवर काम करण्याची मिळालेली संधी व वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारानुसार काम करून, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करण्याला आपले प्राधान्य राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.