धरणात 91.21 टक्के साठा : संततधार पाऊस सुरूच
पिरंगुट – मुळशी धरण भागात पडत असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज सकाळी मुळशी धरण 91.21 टक्के भरले आहे. यामुळे रविवारी (दि. 16) सकाळी 11 वाजल्यापासून धरणातून मुळा नदीत 1 हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाचा अंदाज पाहून विसर्ग कमी जास्त होऊ शकतो असे प्रशासनाने सांगितले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून मुळशी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुठा, रिहे, कोळवण आदी खोऱ्यांसह पूर्व भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. मुळशी धरण भागात पावसाची संततधार सुरू असून धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
नदी काठची गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करू नये. तसेच वीजेवरील मोटरी, इंजिने, शेती अवजारे आदी साहित्य, जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. कोणतीही जीवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन मुळशी तहसीलदार कार्यालय व टाटा पॉवर प्रशासनाने केले आहे.
- धरण परिसरात रविवारी झालेला पाऊस (एकूण पाऊस) मीमिमध्ये
माले : 95 (1744), दावडी : 236 (4193), ताम्हिणी : 239 (5474), शिरगाव : 220 (4437), आंबवणे : 173 (3621).