मुंबई – मराठमोळी अभिनेत्री विशाखा सुभेदार तिच्या विनोदी शैलीमुळे खासकरून ओळखली जाते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोद्वारे तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र सर्वांना हसवणारी विशाखा आता एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात ती डॅशिंग अंदाजात पाहायला मिळणार आहे. नुकताच तिचा या चित्रपटातील हा लुक समोर आला आहे.
‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात विशाखा ‘मगरु’ या ‘शार्प शूटर’ ची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात ती एकदम रावडी लुकमध्ये दिसत आहे. हातात बंदूक, लेदर जॅकेट, हातात सेफ्टी गार्ड अशा लुकमध्ये विशाखाला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यात ती एका नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे.
तिच्या भूमिकेबद्दल विशाखाने सांगितले की, ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं तिने सांगितले.
View this post on Instagram
‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट येत्या 24 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद खांडेकरनं केले आहे. विशाखासोबत या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, सयाजी शिंदे, भाऊ कदम, प्रसाद खांडेकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार ही कलाकार मंडळी दिसणार आहेत.