मुंबई : अभिनेत्री विशाखा सुभेदार (Visakha Subedar) तिच्या विनोदी शैलीमुळे खासकरून ओळखली जाते. मात्र ‘मुरांबा’ या मालिकेत ती वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाली. यात तिने खलनायिकेची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिच्या भूमिकेबाबत ती अनेकदा माहिती सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच तिने इनस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. मात्र या फोटोमधील तिचा लुक काहींना पटला नाही.
विशाखाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने एका कार्यक्रमासाठी लांब सिल्व्हर जॅकेट असलेला ड्रेस घातला होता आणि थोडी वेगळी केसभुषा केली होती. नेहमी पारंपारिक कपड्यांमध्ये आणि साडीमध्ये वावरणाऱ्या विशाखाला या फोटोतील ड्रेसमध्ये पाहिल्यावर एका चाहतीने कमेंट केली होती.
तिने लिहिले की, “मी जे लिहिणार आहे, ते वाचून तू बहुतेक माझा राग करशील पण तुझ्यावर मनापासून प्रेम करते म्हणून न राहावून लिहिते. खोट्या कमेंट्स वाचून स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस. तू जशी आहेस, तशीच छान आहेस, तू उत्तम अभिनेत्री आहेस, हे तू खूप वेळा सिद्ध केलंय. पण तुला या लूकमध्ये पाहून मनाला त्रास झाला. तू म्हणशील सगळे कौतुक करतायत आणि ही असं का म्हणतेय, पण तुझ्याबद्दल अटॅचमेंट वाटते, त्यामुळे मी लिहिलं तू राग मानू नकोस.”
View this post on Instagram
या कमेंटला विशाखाने उत्तर देत लिहिले की, “तुमच्या भावना समजू शकते, नसेल आवडलं तुम्हाला पण यात वाईट काय दिसतंय? ज्याचा तुम्हाला त्रास झाला. एका डान्स परफॉर्मन्ससाठी तयार झाले होते, त्याचे हे कपडे आहेत, कारण त्यांची मागणी तशी होती.”
यावर या चाहतीने पुन्हा कमेंट करत विशाखाची माफी मागितली. “मला तुला नाव ठेवायचं नव्हतं, पण मला कदाचित ते नीट मांडता आलं नाही म्हणून तुझा गैरसमज झाला असेल. माझ्या बोलण्याचे तुला वाईट वाटलं असेल तर माफी मागते. पण मी वाईट हेतुने काहीच बोलले नव्हते,” असे चाहती म्हणाली. यावर “मला अजिबात वाईट वाटले नाही, खरंच.. मला तुमचं प्रेम समजतं” असं विशाखा म्हणाली.