नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली 2021 या वर्षीही सर्वांधिक मूल्य असणारा सिलेब्रिटी ठरला आहे. ब्रॅंड व्हॅल्यूमध्ये 22 टक्क्यांची घसरण होऊनही विराटने सलग पाचव्या वर्षी तो मान मिळवला आहे.
डफ अँड फेल्प्स या संस्थेने भारतीय सिलेब्रिटींच्या ब्रॅंड व्हॅल्यूविषयीचा वार्षिक अहवाल जारी केला. त्यानुसार, विराटची ब्रॅंड व्हॅल्यू 185 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. रूपयांमध्ये ते मूल्य सुमारे 1 हजार 400 कोटी रूपये इतके भरते. विराटची ब्रॅंड व्हॅल्यू 2020 या वर्षी 237 दशलक्ष डॉलर्स होती. संबंधित यादीत अभिनेता अक्षय कुमारला मागे टाकून अभिनेता रणवीर सिंह याने दुसरे स्थान पटकावले आहे. रणवीरची ब्रॅंड व्हॅल्यू 1 हजार 200 कोटींच्या घरात पोहचली आहे. तिसऱ्या स्थानावर गेलेल्या अक्षयचे मूल्य सुमारे 1 हजार कोटी रूपये इतके आहे.
सर्वांधिक मूल्य असणाऱ्या सिलेब्रिटींच्या यादीत अभिनेत्री आलिया भटने दोन स्थानांची झेप घेत चौथे स्थान पटकावले आहे. तिची ब्रॅंड व्हॅल्यू 517 कोटी रूपये (68 दशलक्ष डॉलर्स) इतकी आहे. यादीत पाचव्या स्थानी भारतीय क्रिकेट संघाचा आणखी एक माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (61 दशलक्ष डॉलर्स) आहे. आधीच्या वर्षी 11 व्या स्थानी असणाऱ्या धोनीची ब्रॅंड व्हॅल्यू 69 टक्क्यांनी वाढली. यादीत बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सहाव्या (54 दशलक्ष डॉलर्स), तर अभिनेत्री दीपिका पदुकोण सातव्या (51 दशलक्ष डॉलर्स) स्थानी आहेत.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यादीत 11 व्या स्थानी आहे. त्याची ब्रॅंड व्हॅल्यू 47 दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार 32 दशलक्ष डॉलर्स मुल्यासह 13 व्या स्थानी आहे. आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिने प्रथमच टॉप 20 मध्ये स्थान मिळवले आहे. सिंधूने 20 वे स्थान पटकावले असून तिची ब्रॅंड व्हॅल्यू 22 दशलक्ष डॉलर्स इतकी ठरली आहे.
यादीतील टॉप 20 सिलेब्रिटींमध्ये पाच जण क्रीडा क्षेत्रातील, तर उर्वरित बॉलीवूड आणि इतर मनोरंजन क्षेत्रांमधील आहेत.या यादीत विराट कोहली, रणवीर सिंह, अक्षय कुमार, आलिया भट, महेंद्रसिंग धोनी सचिन तेडूलकर, अमिताभ बच्चन, दिपिका पदुकोन यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.