तेल अवीव (इस्राईल) – इस्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर शनिवारी संध्याकाळी हजारो निदर्शकांनी जोरदार निदर्शने केली. इस्राईलमध्ये अलिकडच्या काळात सरकारविरोधात आंदोलन सुरू झाल्यापासून हे सर्वात मोठे आंदोलन होते, असे निरीक्षकांनी म्हटले आहे.
या निदर्शनांमध्ये किमान 10 हजार निदर्शक सहभागी झाले होते. कॅसेरा येथील नेत्यान्याहू यांच्या खासगी निवासस्थानाबाहेरही अंदाजे एक हजार निदर्शकांनी निदर्शने केली. देशातील अनेक उड्डाणपूल आणि महामार्गांवरही ठिकठिकाणी निदर्शने होत होती.
या आंदोलनाच्या सुरुवातीलाच आंदोलकांमधील चार जणांना पोलिसांनी अटक केली. आंदोलकांवर रॉकेट मारून हिंसाचार भडकावण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आंदोलनादरम्यान कोणत्याही हिंसाचाराला पोलीस खपवून घेणार नाहीत, असे पोलिसांच्या -वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तोडफोड, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल अशी कोणतीही कृती आंदोलनादरम्यान केली गेली, तर आंदोलनकर्त्यांची गय केली जाणार नाही, असेही इस्राईल पोलिसांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांच्याविरोधात लाचखोरी, सार्वजनिक विश्वासघात, गैरव्यवहाराची प्रकरणे प्रलंबित आहेत. याच आरोपांमुळे नेत्यान्याहू यांना सर्व राजकीय पदांचा त्याग करावा लागला होता आणि इस्राईलमध्ये नव्याने निवडणूका घ्याव्या लागल्या होत्या. मात्र स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अल्पावधीत पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या. त्यात नेयान्याहू यांच्या पक्षाला काठावरचे बहुमत मिळाले आहे.