मॉस्को – जगातील अनेक देश सध्या इंधन दरवाढीमुळे त्रस्त आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले की, देशांतर्गत इंधनाची दरवाढ होते. मात्र अनेक देशांमध्ये करातील तूट भरून काढण्यासाठीही इंधन दरवाढ करण्यात येते. मात्र कझाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीविरोधात स्थानिकांनी मोठा गरादरोळ केला असून या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
२ जानेवारी रोजी येथील वाहनाच्या इंधनाचे दर जवळपास दुप्पट करण्यात आले होते. याविरोधात स्थानिकांनी असंतोष व्यक्त केला. या असंतोषाचे रुपांतर आंदोलनात झालं. त्यानंतर या आंदोलनाचं लोण संपूर्ण देशात पसरलं.
दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी राष्ट्रपतींसह अनेक नेत्यांची घरं पेटवून दिली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. त्यामुळे हिंसा आणखी भडकली. या हिंसेत आतापर्यंत १६४ जण ठार झाले.
दरम्यान कजाकिस्तानचे राष्ट्रपती कसीम जोमार्ट टोकायव यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अखेरीस कठोर पावलं उचलण्यात आली. कसीम यांनी देशात दोन आठवड्यासाठी आपात्कालीन स्थिती घोषित केली आहे. यामध्ये नाईट कर्फ्यूचे देखील आदेश देण्यात आले आहे. तरी देखील आंदोलक आक्रमक झाले. त्यानंतर येथील सरकारला राजीनामा द्यावा लागला आहे. सध्या येथे इंटरनेट सेवा देखील बंद कऱण्यात आली आहे.