पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाकडून आदर्श आचारसंचितेचे उल्लंघन होत असल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)चे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी निदर्शनास आणून दिली आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी, भिंतींवर भाजपाचे चिन्ह रंगविण्यात आले आहेत.
त्यामुळे आचारसंहिता नियमांची पायमल्ली होत असून प्रशासनाने यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना कामठे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.
यासंदर्भात शहराध्यक्ष कामठे यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून आदर्श आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे.
त्या पार्श्वभूमीवर शहरात महापालिका प्रशासनाकडून राजकीय पक्ष चिन्हे, नावे इत्यादी झाकण्याचे तसेच राजकीय जाहिरात होर्डिंग फ्लेक्स काढण्याचे काम करण्यात येत आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत भाजपकडून शहरभरात शेकडो सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर पक्षाचे चिन्ह कायमस्वरूपी रंगविण्यात आले आहेत. त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे.
शहरात ज्या ज्या ठिकाणी असे पक्ष चिन्ह व नाव रंगविण्यात आले आहे. ते महापालिका प्रशासन तथा निवडणूक विभागाकडून तात्काळ मिटविण्यात यावे. शिवाय आचारसंहिता भंगाच्या घटना घडणार नाहीत, याकडे कुठल्याही राजकीय पक्षाचा अभिनिवेश किंवा दबाव न बाळगता कारवाई करावी, अशी सूचना अध्यक्ष कामठे यांनी पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे.