पुणे :– देशांतर्गत क्रिकेट हंगामातील 19 वर्षांखालील गटाची विनू मांकड क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघास महाराष्ट्र क्रिकेट (Maharashtra Cricket Association) संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी 25 लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर केले. महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरीच्या जोरावर मुंबईचा 115 धावांनी पराभव करून सोमवारीच या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजेतेपदासाठी मी संपूर्ण संघ, प्रशिक्षक कर्मचारी आणि निवड समितीचे अभिनंदन करतो आणि विजेत्या संघाला 25 लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करतो असे एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने अर्शीन कुलकर्णीच्या (133) शतकी खेळीने महाराष्ट्राने 50 षटकांत 6 बाद 316 धावा केल्या. दिग्विजय पाटील (74), सचिन धस (66), किरण चोरमले (66) यांची साथ मिळाली. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या मुंबईला 35.2 षटकांत 201 धावांतच रोखले. स्वराज चव्हाणने 45 धावांत 5 गडी बाद केले. त्याला प्रतिक तिवारीने दोन, तर अर्शीनने एक गडी बाद करून सुरेख खेळी केली.
एकदिवसीय स्पर्धेसाठी निवड..
या संघातील अर्षिन कुलकर्णी, सचिन धस, किरण चोरमले, साहिल पारख, सोहन जमाले, अनुराग कवडे आणि दिग्विजय पाटिल यांची 19 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यासाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे.