Shri Vighnahar Cooperative Sugar Factory – मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा व्यक्त करण्यासाठी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या (Shri Vighnahar Cooperative Sugar Factory) गळीत हंगामाचा शुभारंभ कोणत्याही राजकिय व्यक्तीच्या हस्ते न करता मराठा सामाजातील समन्वयक,
आंदोलक व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांचे शुभहस्ते १ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता श्री विघ्नहर कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर (Satyashil Sherkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, कारखान्याचा गळीत हंगाम माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील इतर मंत्री, खासदार, आमदार व इतर मान्यवर उपस्थित राहणार होते. मात्र मराठा समाजाच्या आंदोलनास पाठींबा व्यक्त करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याने २ नोव्हेंबर रोजी होणारा गळीत हंगाम शुभारंभ रद्द करुन तो कार्यक्रम १ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हा कार्यक्रम घरगुती पध्दतीने मोजक्याच लोकांमध्ये संपन्न होणार आहे. तसेच २ नोव्हेंबर रोजी होणारा नियोजित कार्यक्रम स्थगीत करण्यात आल्याची माहिती सर्व नेतेमंडळी, मंत्री यांना देण्यात आली आहे, अशी माहिती चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी दिली.
विघ्नहरच्या आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गळीत हंगाम २०२२-२३ साठी अंतीम ऊस भाव विनाकपात रु.३०५०/- प्र.मे.टन देण्याचे निश्चित केले आहे.
विघ्नहरने एफ. आर. पी. नुसार आजअखेर रु. २७५०/- प्रतिटन बाजारभाव अदा केला असून उर्वरीत रु.३००/- प्र.मे.टनप्रमाणे पेमेंट दि. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
तसेच कामगारांना १५% प्रमाणे बोनस, त्याचप्रमाणे फरकाची रक्कम व इतर देणी दिपावलीपूर्वी अदा करणर आहोत, असे शेरकर यांनी जाहिर केले. यावेळी व्हाईस चेअरमन अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.