पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे.
अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, एमसीए, आर्किटेक्चर, बीएड, एमएड, बीएड- एमएड, विधी, हाॅटेल मॅनेजमेंट, बीपीएड, एमपीएड, बीए व बीएस्सी-बीएड या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येते. ही सर्व प्रक्रिया राज्य सीइटी सेलमार्फत राबविण्यात येते. यासाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३० जानेवारीपर्यंत आहे.
सीईटीसाठी नोंदणी केल्यानंतर संबंधित अभ्यासक्रमाची सर्व माहिती प्राप्त होते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करता येइल. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि प्रत्यक्ष प्रवेशाची निवड यादी जाहीर होइल. ही सर्व प्रकि्रया पूर्ण होण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. बीएड-एमएड या तीन वर्षाच्या इंटिग्रेडेट अभ्यासक्रम, एमएड, एमपीएड, बीपीएड, बीए व बीएसस्सी बीएड, एमबीए, आर्किटेक्चर, एमसीए, हाॅटेल मनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी नोंदणी दि. १० जानेवारीपासून सुरु झालेली आहे.
एमएचटी-सीईटीसाठी नोंदणीस सुरवात
अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी घेतली जाते. त्यासाठी आजपासून (दि. १६) नोंदणी करण्यास सुरवात झाली आहे. एमएचटी-सीईटी १६ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध होतील.
विधी (लाॅ) सीईटी नोंदणी दि. १८ पासून
बारावीनंतरच्या पाच वर्षीय विधी अभ्यासक्रम प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणी दि. १८ जानेवारीपासून लिंक खुली केली जाणार आहे. तसेच, तीन वर्षीय विधी अभ्यासक्रम सीईटीसाठी नोंदणी यापूर्वीच सुरु झालेली आहे.