मुंबई – अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या देशातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्यासोबत सर्वच स्टार काम करण्यास प्राधान्य देतात. ती सध्या अनिल कपूर आणि हृतिक रोशनसोबत सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ या सिनेमाचं शूटिंग करत आहे. दिपीकाकडे अमिताभ बच्चन, प्रभास आणि कमल हासन यांच्यासोबत ‘कल्की 2898 एडी’ देखील आहे. दीपिकाची नजर हॉलिवूडकडेही आहे आणि तिने याआधी विन डिझेलसोबत ‘XXX – रिटर्न ऑफ झेंडर केज’ या मोठ्या चित्रपटात काम केले आहे.
आता आंतरराष्ट्रीय सुपरस्टारने दीपिका पदुकोणसोबत त्याच्या भारत ट्रीपमधील एक फोटो शेअर केला आहे आणि चाहते या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत आहे. फोटोत विन आणि दीपिका ऑटो रिक्षात ड्रायव्हरची सीट शेअर करताना दिसत आहे. विन डिझेलने लिहिले, ‘भारतात प्रवास करून त्यांच्या सुंदर संस्कृतींचा अनुभव घेतल्याबद्दल मी कृतज्ञ आणि धन्य आहे.
भारतीय चाहते या फोटोवर लाईकचा वर्षाव करत झाले तर काही जण विनला ‘फास्ट अँड फ्युरियस’ मालिकेसाठी दीपिकाला सामील होण्यास सांगत होते. विन डिझेलने दीपिका पदुकोणसोबत जुना फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जूनमध्ये, फास्ट अँड फ्युरियस सुपरस्टारने त्यांच्या XXX: द रिटर्न ऑफ झेंडर केज या चित्रपटातील दीपिकासोबतचा एक फोटो शेअर केला. फोटो शेअर करताना, डिझेलने उघड केले की दीपिका पदुकोण त्याच्या “आवडत्या” सहकलाकारांपैकी एक आहे आणि तो भारतात परत येण्यास उत्सुक आहे. दीपिका आणि विन यांच्याबद्दल अशीही अफवा होती की दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र या दोघांपैकी कोणीही हे कधीही मान्य केले नाही.