राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नांदूरमध्ये स्वागत
नांदूर- राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा इंदापूर, न्हावरा आणि शिरूरचा दौरा समजताच गावाच्या या लेकीचा सत्कार करण्यासाठी नांदूरमधून सहजपूर फाटा या ठिकाणी गावातील सर्व मंडळी एकत्रित आली.
गावकरी मंडळींना वाट पाहात असतील असा विचार करत गाडीतून उतरल्यावर रूपाली गावकऱ्यांना पुन्हा उशीर होणार नाही असे सांगितले. तेव्हा सत्कार करणाऱ्या आलेल्यापैकी गावातील एक वयोवृद्ध व्यक्ती, त्यांना म्हणाली की, ताई, असू दे. आता आम्ही समजून घेतो; पण तुम्ही आता गोरगरिबांची काम करा. नांदूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या रूपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून पाहिल्यानंतर गावकऱ्यांसाठी क्षण अविस्मरणीय होता.
रूपाली चाकणकर या बबन कुंडलिक बोराटे (रा. नांदूर ता. दौंड) यांची कन्या आहे. त्यांचे सहावीपर्यंतचे शिक्षण नांदूरमध्ये झाले, त्यानंतर पुढचे शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले. शिक्षण चालू असतानाच लग्नाचा योग आल्याने त्या विवाहबंधनात गुंतल्या. धायरी येथील चाकणकर घराण्यात यांचा विवाह झाला. रूपाली यांच्या सासूबाई नगरसेविका म्हणून काम पाहत होत्या, त्यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारस रूपाली चाकणकर यांनी चालू ठेवला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये काम करत असताना छोटी-मोठी आंदोलने त्यांनी केली, त्यांचे काम पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांना खडकवासला मतदार संघ अध्यक्ष ते पुणे शहर अध्यक्षपद दिले. या सर्व कामाचा आढावा घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रूपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली. त्यानंतर आज (दि. 3) नांदूर (ता. दौंड) येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.