उंब्रज – चरेगांव ता. कराड चार दिवसांपूर्वी सापडलेल्या करोनाबाधित महिलेल्या संपर्कातील अन्य चार जणांचे अहवाल शनिवारी सकाळी पॉझेटिव्ह आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून भितीचे वातावरण पसरले आहे. करोनामुक्त झालेल्या चरेगावात पुन्हा ट्रॅव्हल हिस्ट्रीने करोना रुग्णसंख्येत वाढ होतेय की काय? अशी चिंता व्यक्त होत आहे.
गत चार दिवसांपूर्वी वाईहून चरेगाव येथे एक महिला माहेरी आली होती. तिला पाठदुखीचा त्रास असल्याने कराड येथे सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी ती गेली होती. याठिकाणी वैद्यकीय सूत्रांनी तिच्याकडे विचारपूस केली असता मुंबईहून वाई, चरेगाव असा प्रवास केल्याचे सांगितले. तसेच सोबत दोन मुले, सून, आणि नात यांना घेऊन आल्याचे सांगितले. तिचे स्वॅब तपासले असता ती करोनाबाधित असल्याचे समोर आले.
उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार व उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी तातडीने चरेगाव येथे भेट देऊन पाहणी केली. हाय रिस्क मधील घरातील चार जणांना इन्स्टिट्यूट क्वारंटाइन करण्यात आले. तर लो रिस्कमधील चौदा जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते.
पैकी हाय रिस्क मधील चार जणांचा शनिवारी सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये एका चार वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. डॉ. संजय कुंभार यांनी पुन्हा तातडीने घटनास्थळी भेट देऊन सहाआरोग्य टिमव्दारा परिसरातील नागरिकांचा होम टू होम सर्व्हे सुरू केला आहे.