पुणे – करोना संसर्गाने गंभीर बाधितांचा आकडा मागील पाच दिवसांत धक्कादायकरीत्या वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. या बाधितांना ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांचा आकडा दररोज 600 च्या आसपास जात आहे. अनेक जण लक्षणे दिसल्यानंतर उशिरा समोर येत असल्याचे समोर आले आहे. पावसाळी वातावरणामुळे ही लक्षणे व्हायरल फ्लूची असून करोनाची नाहीत, असा समज करून अनेक जण लक्षणांकडे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी, शहरात तीव्र लक्षणे असलेले करोनाबाधित अचानक वाढले आहेत. यांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर उपचार सुरू करण्यात आले, तरी उपचारासाठी निश्चित प्रोटोकॉल तसेच ठोस औषध नसल्याने रुग्णाला असलेले इतर आजार, लक्षणांचे स्वररुप लक्षात घेऊन त्यांना औषधे दिली जात आहेत. मात्र, अनेकांना इतर आजार आणि आता करोना संसर्ग झाल्याने अशा बाधितांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.
परिणामी, ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड कमी पडत आहेत. यासाठी अनेकजण वेटिंगवर आहेत. बहुतांश बाधितांना उपचार सुरू असतानाच अचानक ऑक्सिजनची गरज भासल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
शहरात करोनाबाधित गंभीर रुग्णांचा आकडा वाढत आहे. हे सध्या उपचार घेत असलेले रुग्णच असून त्यांना ऑक्सिजनची गरज भासत आहेत. हे लक्षात घेऊन कोविड हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमधील ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेडची माहिती प्रत्येक तासाला अपडेट करण्यात येत आहे.
– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, महापालिका
ऑक्सिजनची सुविधा असलेले केवळ 552 बेड
महापालिकेकडे ऑक्सिजनची सुविधा असलेले केवळ 552 बेड उपलब्ध आहेत. हे बेड 31 कोविड केअर सेंटर आणि 8 डेडिकेटेड कोविड सेंटरमध्ये उपलब्ध आहे. शिवाय नियंत्रित करण्यात आलेल्या 16 रुग्णालयांत 1 हजारच्या आसपास ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड आहेत. मात्र, येथील एकही ऑक्सिजन बेड तातडीने मिळत नसल्याचे चित्र आहे. तर पालिकेकडील सध्याचे सर्व बेड भरलेले आहेत. त्यामुळे अचानक वाढलेल्या गंभीर रुग्णांना बेड शोधताना आरोग्य विभागाची दमछाक होत आहे.