कोलकाता – लग्नास नकार दिल्यामुळे अल्पवयीन प्रियकराने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रियकराने आपल्या प्रेयसीला आत्महत्येची माहिती दिली होती. असे असताना सुद्धा प्रेयसीने काहीच केले नाही म्हणून गावकऱ्यांनी मुलीला मारहाण करत तीचे मृतदेहासोबत लग्न लावून दिले.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या बर्दवान भागातील आहे.
अल्पवयीन मुलगा व त्याची प्रेयसी यांचे दोघांचे धर्म वेगवेगळे होते. असे असले तरी दोन्हीकडच्या नातेवाईकांना यांचे लग्न मान्य होते. मात्र मुलीच्या आईने मुलगा अल्पवयीन असल्याचे कारण देत या लग्नास नकार दिला. त्यामुळे या कारणावरुन मुलगा व मुलगी यांच्यामध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. त्यातूनच मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापुर्वी त्याने आपल्या प्रेयसीला आत्मह्त्या करत असल्याची माहिती दिली. व व्हॉट्सअॅप व्दारे प्रेयसीला स्वत:चा फोटो पाठवला त्यानंतर आत्महत्या केली.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी याप्रकरणी मुलगी आणि तिच्या आईला जबाबदार धरत दोघींना मारहाण केली. यानंतर दोघींलाही जबरदस्ती मुलाच्या मृतदेहाजवळ आणण्यात आले. यानंतर मुलाच्या मृतदेहाकडून मुलीच्या भांगात कुंकू भरण्यात आले. यावेळी आत्महत्या ग्रस्त मुलाच्या शेजारीचे रहिवासी म्हणाले की, मुलगा आत्महत्या करत आहे याची मुलीला कल्पना होती. या मुलीकडे त्याच्या आईचा फोन नंबरही होता. मात्र, तरीही याबाबत मुलाच्या कुटुंबीयांनी तिनं माहिती दिली नाही. वेळेवर मुलाच्या घरच्यांना याबाबत माहिती दिल्यास त्याला वाचवता आले असते.
पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मारहाण आणि अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची तक्रार मुलीच्या आईनेही पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. आरोपींविरोधात लवकरच कारवाई केली जाईल. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.