‘आयटीआय’साठी केलेल्या खरेदीची चौकशी करा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागातून होणारी बहुतांश खरेदी ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उद्यान विभागासाठी करण्यात येणारी सव्वादोन कोटींच्या खरेदीत अनोगोंदी झाल्याचे निदर्शनास आले असून काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या आयटीआयसाठी केलेली खरेदतही भ्रष्टाचार झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली असून त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही लांडे यांनी सांगितले.
महापालिकेच्या भांडार विभागातील अनागोंदी कारभाराबाबत लांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधत या विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या सर्व खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, महापालिकेच्या भांडार विभागाने गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपयांची खरेदी केली आहे.
ठराविक ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने या ठिकाणी कारभार सुरू आहे. उद्यान विभागसाठी बेंच, वायसीएममधील फर्निचर, शाळांसाठीचे बेंच तसेच उद्यान विभागाच्या “ट्री गार्ड’ खरेदीमध्ये अत्यंत भ्रष्टाचार झाला आहे. आयुक्त, अतिरिक्तआयुक्त व सहायक आयुक्तांच्या आशीर्वादाने हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. ठराविक ठेकेदार डोळ्यासमोर ठेऊन राबविण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियेमुळे महापालिकेची लूट सुरू आहे. पालिकेच्या आयटीआयसाठी गेल्या दोन वर्षांत कोट्यवधी रुपयांची मशीनची खरेदी करण्यात आली आहे.
जुन्याच मशीनला रंग-रंगोटी करून त्या नव्या म्हणून बसविण्यात आल्याचेही प्रकार निदर्शनास आले आहेत. तर यावर्षीचीही खरेदी बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने चढ्या दरात करण्यात आली आहे. या प्रकाराची चौकशी होणे अपेक्षित असून याबाबत आपण मुख्यमंत्री व उमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे.
सत्ताधाऱ्यांनी धाडस दाखवावे
भ्रष्टाचार विरहित कारभाराचे गोडवे गाणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने भांडार विभागातील खरेदीची चौकशी करावी, असे आव्हानही विलास लांडे यांनी यावेळी दिले. या भ्रष्टाचाराला सत्ताधाऱ्यांचीही साथ असल्याने ते चौकशीपासून स्वत:ला दूर ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र राज्यातील सत्तांतरानंतर स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भ्रष्टाचार केला नसेल त्यांनी या विभागाच्या खरेदीच्या चौकशीचे धाडस दाखवावे, आव्हानही लांडे यांनी यावेळी बोलताना दिले.