Ram Mandir – भारतात ज्या गोष्टीची सर्वाधिक चर्चा होते, त्याच्या नावाने फसवणुकीचे प्रकार होताना दिसतात. सध्या देशभरात अयोध्येचे राम मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा चर्चेत आहे. राम मंदिरासाठी लोक खूप दान करत आहेत. 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत पण या सोहळ्यासाठी केवळ निमंत्रितांनाच उपस्थित राहता येणार आहे.
22 जानेवारीला ज्यांना निमंत्रण आले आहे तेच लोक अयोध्येला जाऊ शकतात. मात्र राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा फायदा सायबर चोर घेत आहेत. सध्या राम मंदिरात दान, प्रसाद, व्हीआयपी पास असे अनेक प्रकार घडत आहेत. याचा फायदा घेऊन सायबर भामटे रामभक्तांना आपल्या जाळ्यात ओढत असून मोठी आर्थिक फसवणुक करत आहेत. कशी होते फसवणुक पहा..
मोफत व्हीआयपी पास –
22 जानेवारीला अयोध्येत प्रवेशासाठी व्हॉट्सअॅपवर व्हीआयपी पास पाठवले जात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हे पास प्रशासनाकडून नसून सायबर गुंडांकडून पाठवले जात आहेत. व्हॉट्सअॅपवर पाठवल्या जाणाऱ्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, “22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी तुम्हाला VIP पास मिळत आहे; अॅप्लिकेशन इन्स्टॉल करून VIP पास डाउनलोड करा.”
अनेकांना व्हॉट्सअॅपवर सेव्ह करा असे मेसेज आले आहेत. हा पास दाखवून तुम्हाला 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात प्रवेश दिला जाईल. या मेसेजसोबत एका अॅपची एपीके फाइलही पाठवली जात असून लोकांना मोफत व्हीआयपी पाससाठी हे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे.
वास्तविक, या एपीके फाइलद्वारे हॅकर्स तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करत आहेत. मालवेअर इन्स्टॉल झाल्यावर ते तुमचा फोन रिमोटली पूर्णपणे नियंत्रित करू शकतात. त्यानंतर ते तुमच्या बँक खात्यातही घुसू शकतात. आणि तुमची मोठी आर्थिक फसवणुक होत आहे.
राम मंदिरासाठी देणगी –
राम मंदिराच्या नावाने अनेक पेज सोशल मीडियावर सक्रिय झाली आहेत. एका पेजचे नाव आहे “श्री रामजन्मभूमी तीर्थ छेत्र अयोध्या, उत्तर प्रदेश” असे बनवण्यात आले आहे. मात्र हे बनावट आहे. या पेजवर एक क्यूआर कोडही शेअर करण्यात आला असून लोकांकडून देणग्या मागितल्या जात आहेत. इस्कॉनकडून राम मंदिरासाठी देणगीचा संदेश येत असल्याचा दावा अनेक युजर्सनी केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे पूर्णपणे बनावट आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राम मंदिराच्या नावावर कोणीही दान करू नका. कारण हे दान तुम्ही राम मंदिराला करत नाहीत तर ते थेट त्या सायबर भामट्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
राम मंदिराचा मोफत प्रसाद –
अशा अनेक वेबसाइट्स देखील दिसून आल्या आहेत ज्या दावा करत आहेत की ते राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनंतर तुमच्या घरी प्रसाद पोहोचवतील. या साइट्स प्रसादाचे बुकिंगही घेत आहेत. खादी ऑरगॅनिक नावाची अशी एक साइट आहे. ही साइट लोकांच्या घरी प्रसाद पोहोचवण्याचे आश्वासन देते. मात्र ही एक बनावट साइट आहे. अशाच प्रकारचे दावे करणाऱ्या इतर अनेक साइट्स आहेत. रामभक्तांनी कशावरही विश्वास ठेऊ नये. व्हाट्सअॅपवर आलेल्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करु नये, अथवा कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये, जर केले तर तुमची मोठी आर्थिक फसवणुक होऊ शकते.