पुणे – महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी रविवारी आपला पदभार शेखर गायकवाड यांच्याकडून स्वीकारला. राज्यशासनाने शनिवारी सायंकाळीच या बदलीचे आदेश काढले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच कुमार यांनी पदभार स्वीकारला.
शहरात लॉकडाऊन सुरू करण्यात येणार आहे. मात्र, त्याबाबतचा आदेश माजी आयुक्त गायकवाड यांनी काढलेला नाही. तसेच तो तातडीने काढणे आवश्यक असल्याने कुमार यांनी हा पदभार स्वीकारल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विक्रमकुमार हे 2004 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून 2005 मध्ये त्यांनी अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय कामास सुरुवात केली. त्यानंतर वाशिमचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त, औरंगाबाद जिल्हाधिकारी, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच पीएमआरडीए आयुक्त म्हणून ते 15 मार्च 2019 पासून कार्यरत होते. तर, आता ते महापालिका आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.