मुंबई लोकल संदर्भात विजय वडेट्टीवारांचे मोठे विधान; म्हणाले,…

मुंबई : राज्यभरातील करोनाची दुसरी लाट ही आता ओसरताना दिसत आहे.मुंबईतही आता करोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या लोकल ट्रेन संदर्भात आता चर्चा होताना दिसत आहे. मात्र  मुंबई लोकल संदर्भात  काही गोष्टी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी करोना संपल्याशिवाय मुंबईची लोकल सुरु होणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीही लोकल इतक्यात सुरू करण्याबाबत असमर्थता दर्शवली होती.

लोकल सुरू करताना ती टप्प्याटप्प्याने म्हणजेच आधी महिलांसाठी किंवा विशिष्ट कर्मचाऱ्यांसाठी अशा पद्धतीने सुरू केली जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असली तरी टप्पा तीनचेच निर्बंध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने लोकलने प्रवास करण्यासाठी वाट पहावी लागणार असल्याचे  स्पष्ट आहे.

मुंबईतील करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मुंबईत सोमवारपासून सध्याच्या निर्बंधांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. राज्य सरकारच्या निकषांनुसार मुंबईचा समावेश आता टप्पा एकमध्ये झालेला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी टप्पा तीनचेच निर्बंध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.