मुंबई – शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती विंताजनक असली तरी स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवतारे यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांची कन्या ममता शिवदीप लांडे-शिवतारे होत्या. शिवतारे यांच्यावर या आधी बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. तसेच गेल्या दीड वर्षापासून त्यांना मूत्रपिंडाच्या आजारानेही ग्रासले आहे.
दरम्यान, शिवतारे यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद उफाळले आहेत. विजय शिवतारे यांच्या मुलीने फेसबुक पोस्ट करत आपल्या भावांच्या संपत्तीच्या हव्यासापोटी वडिलांची ही अवस्था झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, मुलीच्या आरोपाला त्यांची आई आणि विजय शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे यांनी उत्तर दिले. त्यांनी मुलगा विनयच्या फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह करत सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले.
गेल्या 27 वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे कुटुंबापासून अलिप्त असून दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहात आहेत, असा दावा मंदाकिनी शिवतारे यांनी केला आहे.यामध्ये संपत्ती हा वादाचा विषय नाही, विजय शिवतारेंकडून दोन वर्षांपासून सुरू असलेली मानसिक छळवणूक थांबवणे आणि मानसिक जाचातून सुटका करून घेणे, हा माझा आणि माझ्या कुटुंबाचा एकमेव हेतू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ममता लांडे- शिवतारे यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अवस्थ आहे. मागील काही दिवसात फेसबुकवरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे.
माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही कित्येक वर्षे असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र, कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल असे त्यांना वाटत होते व आजही वाटते.