मोदींचे अश्रू नव्हे तर सरकारची पुरेशी सिद्धताच लोकांच्या कामी येईल – राहुल गांधी

- तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठीची श्‍वेतपत्रिका केली प्रकाशित - वैज्ञानिक आधारावर सरकारला सुचवल्या उपाययोजना

नवी दिल्ली – करोनाची तिसरी लाट येणे आता जवळपास अटळ दिसत असून या परिस्थितीत सरकारने नेमके काय केले पाहिजे या विषयी माहिती देणारे एक श्‍वेत पत्र कॉंग्रेसच्यावतीने आज राहुल गांधी यांनी जारी केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, पहिल्या दोन लाटेत आपली पुरेशी सिद्धता नसल्याने आपल्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

असा प्रकार आता होऊ नये यासाठी सरकारने पुरेशी सिद्धता ठेवली पाहिजे त्यातूनच लोकांचे प्राण वाचणार आहेत. पंतप्रधानांच्या अश्रूंनी लोकांचे प्राण वाचणार नाहीत अशी टिप्पणीही राहुल गांधी यांनी आज केली आहे.

ते म्हणाले की, करोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या लोकांचे प्राण गेले त्यातील 90 टक्के लोकांचे जीव वाचवणे शक्‍य होते. त्यांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण ऑक्‍सिजनचा अभाव हे होते. पंतप्रधानांच्या अश्रूंनी लोकांचे प्राण वाचू शकत नाहीत, पण ऑक्‍सिजनने लोकांचा प्राण वाचू शकतो.पण त्यावेळी त्यांनी ऑक्‍सिजन पुरवठ्याचा विषय गांभीर्याने घेतला नाही कारण त्यावेळी पंतप्रधानांचे सारे लक्ष बंगालच्या निवडणुकीकडे लागले होते. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेची तयारी करताना याची पुरेशी सिद्धता ठेवण्याची गरज आहे.

करोनाच्या या लाटेत ज्या घरातला कर्ता पुरुष गमावला आहे त्या कुटुंबाला सरकारकडून आर्थिक मदत मिळणे आवश्‍यक आहे. सरकारला इंधन दरवाढीतून अलीकडच्या काळात तब्बल चार लाख कोटी रूपये मिळाले आहेत. त्यातून या कुटुंबांना ही मदत करता येणे शक्‍य आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काल केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आम्हाला आर्थिक अडचणींमुळे अशी आर्थिक मदत देता येणे शक्‍य नाही असे म्हटले होते.

राहुल गांधी यांनी आज ती श्‍वेतपत्रिका जारी केली आहे त्यात तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठीचा ब्ल्युप्रिंट आढावाच सादर करण्यात आला आहे. तो सरकारला उपयोगी पडेल असे त्यांनी म्हटले आहे. करोनाची तिसरी लाटही देशासाठी विनाशकारी ठरणार आहे असा इशाराही त्यांनी दिला आहे. आमच्या श्‍वेतपत्रिकेत आम्ही सरकारला काही विधायक सूचना केल्या आहेत त्याचा त्यांनी साकल्याने विचार करावा त्यातून अनेकांचे प्राण वाचू शकतील असे त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.