Vijay Hazare Trophy 2021 : दिल्लीचा महाराष्ट्रावर विजय

जयपूर –भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या दणकेबाज दीडशतकी खेळीने दिल्लीने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा तीन गडी राखून पराभव केला.

दुसरीकडून मुंबईने देखील विजयी मालिका कायम राखल्याने त्यांचे दुसरे स्थान कायम राहिले.
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने 50 षटकांत 7 बाद 328 धावांची मोठी मजल मारली. त्यात केदार जाधवच्या 86 आणि अझिम काझीच्या 91 धावांचा मोठा वाटा होता. त्यानंतर दिल्लीने 7 गडी राखून 330 धावा केल्या. शिखरने 153, तर ध्रुव शोरीने 61 धावांची खेळी केली.

महाराष्ट्राची सुरुवात चांगली झाली नव्हती. रुतुराज गायकवाड, विशांत मोरे लवकर बाद झाले. यश नहारला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्या वेळी केदार जाधंव आणि अझिम काझी ही जोडी जमल्याने महाराष्ट्राचा डाव सावरला गेला. या जोडीने 98 धावांची भागीदारी केली. केदारने 81 चेंडूंत 86 धावांची खेळी केली. त्याने 10 चौकार फटकावले. अझिमला नंतर राहुल त्रिपाठीने सुरेख साथ केली. पण, दोघे लागोपाठच्या चेंडूंवर बाद झाल्याने महाराष्ट्राच्या धावगतीवर परिणाम झाला. अझिमने 73 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 91 धावा केल्या.

आव्हानाचा पाठलाग करताना ध्रुव शोरी आणि शिखर धवन यांनी आक्रमक सुरवात केली. हीच जोडी दिल्लीचा विजय साकारणार असे वाटत होते. 22 षटकांतच त्यांनी 130 धावांची सलामी दिली. त्या वेळी ध्रुव 61 धावांवर बाद झाला. त्यानंतर दिल्लीचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. शिखर धवन एक बाजू धरून खेळल्याने दिल्लीचा विजय सुकर झाला. त्याने 118 चेंडूंत 21 चौकार, एका षटकाराच्या सहाय्याने 153 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक –

महाराष्ट्र – 50 षटकांत 7 बाद 328 धावा. (अझिम काझी 91, केदार जाधव 86, यश नहार 45, विशांत मोरे 24, 3-69) पराभूत वि. दिल्ली – 49.2 षटकांत 7 बाद 330 धावा. (शिखर धवन 153, ध्रुव शोरी 61, क्षितीज शर्मा 36, सत्यजित बच्छाव 3-68).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.