पिंपरी : दूषित पाण्यामुळे बालिकेचा मृत्यू ?

डुडुळगाव येथील लेबर कॅम्पमध्ये 15 ते 17 जणांना उलट्या-जुलाबाचा त्रास

पिंपरी- डुडुळगाव येथील एका लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या एका पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या लेबर कॅम्पमध्यील आणखी काहीजण उलट्या आणि जुलाबामुळे आजारी आहेत. मृत मुलीच्या वडिलांनी दैनिक प्रभात शी बोलताना सांगितले की, दूषित पाण्यामुळे त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला असून आणखी तीन लहान मुले वायसीएम रुग्णालयात भरती आहेत.

गेल्या एक आठवड्यापासून या लेबर कॅम्पमधील लोकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत आहे. आतापर्यंत 15 ते 17 जणांना हा त्रास झाला असून यापैकी चार लहान मुलांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यापैकी एका चिमुकलीला डॉक्‍टरांनी रविवारी दुपारी मृत घोषित केले.

भाविका कमलेश वर्मा (वय 5, रा. वसुंधरा कन्ट्रक्‍शन, डुडुळगाव) असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. तर तिची बहिण रिया कमलेश वर्मा (वय 8) शेजारी राहणारे उमेश रामसिंग बारूला (वय 2) आणि ललिता रामसिंग बारूला (वय 5, तिघेही रा. वसुंधरा कन्ट्रक्‍शन, डुडुळगाव) यांनाही शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून जुलाब उपलट्यांचा त्रास होत असून यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याबाबत दैनिक प्रभात ने मृत मुलीच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वसुंधरा कन्ट्रक्‍शनचे डुडुळगाव परिसरात बांधकाम सुरू आहे. याच ठिकाणी लेबर कॅम्पदेखील आहे. येथील मजुरांना कधी महापालिकेचे तर कधी बाहेरून पाण्याचा पुरवठा होतो. मात्र गेल्या आठ दिवसांपासून येथील नागरिकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत आहे. आत्तापर्यंत 17 जणांना दुषित पाण्याचा फटका बसल्याने ते आजारी पडले आहेत.

शनिवारी सायंकाळी भाविका हिला जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तिला जवळच्या एका डॉक्‍टरकडे नेले. त्यांनी भाविका हिला औषध देऊन घरी पाठविले. रात्रभर भाविका हिला जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत होता. सकाळी हा त्रास आणखीनच वाढल्याने तिच्या वडिलांनी ठेकेदारांच्या मदतीने तिला जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. त्यानुसार रविवारी सकाळी तिला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

दूषित पाण्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. वसुंधरा कन्ट्रक्‍शनच्या लेबर कॅम्पमध्ये जवळपास 100 हून अधिक मजुरांचे कुटुंबीय राहण्यास आहेत.

पोटासाठी पुन्हा आले शहरात
करोनाने शहरात प्रवेश केल्यानंतर वर्मा कुटुंबीय आपल्या गावी निघून गेले होते. करोना कमी झाल्यानंतर पोटापाण्यासाठी पुन्हा या कुटुंबाला शहरात यावे लागले. अवघ्या 20 दिवसांपूर्वी कमलेश वर्मा आपल्या पत्नी व मुलांसह पोटासाठी शहरात परत आले आणि आज त्यांना आपली पोटची मुलगी गमावावी लागली. वर्मा यांचे कोणीही नातेवाईक शहरात नाहीत.

एका मुलीच्या मृत्यू दु:ख उरात दाबून ठेवत दुसऱ्या आजारी मुलीची सेवा करत आहेत. भाविकाच्या मृत्यूनंतर वर्मा पती-पत्नी खूपच भयभीत आहेत कारण त्यांची आणखी एक मुलगी रिया ही देखील तशाच आजाराने त्रस्त असून वायसीएममध्ये उपचार घेत आहे. तिसऱ्या मुलीला शेजाऱ्याकडे ठेऊन पती-पत्नी आपल्या आजारी मुलीला वाचविण्यासाठी धडपडत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.