भोसरीच्या निवडणुकीची रंगत वेगळी ठरणार
पिंपरी – विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागलेले असताना भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या एका वेगळ्याच चर्चेने रंगत आणली आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने हे उमेदवारी मागे घेण्याचीच शक्यता असून यावेळीही त्यांचा “पाडापाडी’साठीच वापर होण्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
माजी विरोधी पक्षनेते वेगळ्याच चर्चेत आले आहेत. सन 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मंगला कदम यांना उमेदवारी देत विलास लांडे यांना डावलले होते. त्या निवडणुकीत लांडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत विजय मिळविला होता. मात्र मंगला कदम यांच्या उमेदवारीला सर्वाधिक विरोध करण्यापासून प्रचारादरम्यान साने यांनी कदम यांच्या विरोधात काम करण्याची एकही संधी सोडली नव्हती. त्या निवडणुकीत कदम या पराभूत झाल्या होत्या. अधिकृत उमेदवाराच्या पराभवास सर्वाधिक साने कारणीभूत ठरले होते.
सन 2014 च्या निवडणुकीत विलास लांडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. मात्र त्या निवडणुकीतही साने यांनी लांडे यांच्या विरोधात प्रचंड कडवी भूमिका घेत महेश लांडगे यांना साथ दिली.
साने यांच्या प्रचाराच्या सभा प्रचंड गाजल्या होत्या. अत्यंत प्रखर टिकेमुळे लांडगे यांना त्याचा फायदा झाला. त्यामुळे लांडे पराभूत तर लांडगे विजयी ठरले होते. आता सुरू असलेल्या निवडणुकीत दत्ता साने यांनी लांडगे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. साने हे उमेदवारी अर्ज मागे घेऊन विलास लांडे यांना साथ देतील, अशीच चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी लांडगे यांच्या विरोधात भूमिका घेत साने यांनी फलकबाजी केली होती. होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गत दोनवेळा साने यांचा “पाडापाडी’साठी विरोधकांनी करून घेतलेला वापर यावेळीही कायम राहण्याची शक्यता आहे. केवळ उमेदवार वेगळा असणार आहे. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणातील “सानेअस्त्रा’चीच चर्चा सध्या चर्चिली जात आहे.