आज होणार चित्र स्पष्ट : निवडणुकीच्या रिंगणातून कोणाचे ‘सीमोलंघ्घन’..?
पिंपरी – स्वपक्षीय उमेदवारांचे अर्ज बाद केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भूमिकेवर दाटलेले मळभ, महायुतीतून फडकलेले बंडाचे निशान या नाट्यावर सोमवारी पडदा पडणार आहे. मनधरणी, “बोलणी’तून कोण निवडणुकीच्या रिंगणातून सीमोल्लंघन करणार याबाबत मतदार राजामध्ये उत्सुकता आहे. नेमके चित्र सोमवारी स्पष्ट होणार असले तरी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदार संघामध्ये अटीतटीच्या दुरंगी लढती होतील, असेच निश्चित मानले जात आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धामधूम संपताच निवडणुकीच्या रिंगणातून कोण माघार घेणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 51 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सहा अर्ज अवैध ठरले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारीचा घोळ घालत आधी उमेदवारी दिलेल्या सुलक्षणा धर यांची उमेदवारी काढून घेत बंडखोरीच्या तयारीत असलेल्या माजी आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून तयारीत असलेल्या शेखर ओव्हाळ यांना डावलण्यात आले.
सुलक्षणा धर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्या निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्या असल्या तरी शेखर ओव्हाळ बंडखोरी करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आयत्यावेळी उमेदवारी बदलूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस याठिकाणी अडचणीत आहे. तर भाजपचे अमित गोरखे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्यासमोरील आव्हाने वाढली आहेत.
चिंचवड विधानसभा मतदार संघात 19 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार प्रशांत शितोळे यांच्यासह पाच जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अधिकृत उमेदवार प्रशांत शितोळे यांना एबी फॉर्मच दिला नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद झाला. मात्र शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यामुळे अद्यापही चुरशीच्या लढतीची अपेक्षा आहे. कलाटे माघार घेणार, की सर्वांचे अंदाज चुकवित कडवी लढत देणार यावर चिंचवडच्या लढतीचे चित्र अवलंबून आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातही आजी-माजी आमदारांमध्ये लढत होणार हे निश्चित मानले जात आहे. या मतदार संघात 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन अर्ज बाद झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने व माजी नगरसेवक जालिंदर शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेवून माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. भाजप महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्याविरोधात लांडे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून याठिकाणी उतरविण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची खेळी आहे. त्यामुळे याठिकाणी शहरातील सर्वाधिक चुरशीची लांडगे विरुद्ध लांडे अशी दुरंगी लढत रंगणार आहे. मागील वेळी आमदार महेश लांडगे यांनी लांडे विरोधकांची एकजुट करीत अपक्ष म्हणून विजय मिळविला होता. हा “फॉर्म्युला’ यावेळी लांडे वापरण्यची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्यावेळी लांडेंच्या विरोधात लांडगेंना साथ देणारे यावेळी पुन्हा लांडे यांच्या कंपूत दाखल झाल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.
माघारीसाठी घोडेबाजार तेजीत – विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्यापासून अनपेक्षित घटनांमुळे पिंपरी-चिंचवडकरांसाठी ही निवडणूक मनोरंजक ठरली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील शांतता आणि पिंपरी व चिंचवड मतदार संघात महायुतीला लागलेले बंडखोरीचे ग्रहण यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला आहे. विरोधी उमेदवारांची मनधरणी करुन त्यांची मते आपल्या पदरात पाडून घेण्याचे सर्वच दिग्गज उमेदवारांचे प्रयत्न आहेत. यामध्ये अपक्ष उमेदवारांचा घोडेबाजार तेजीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वरिष्ठांच्या प्रयत्नांना यश येणार का?
राष्ट्रवादी आणि महायुतीतील बंडोबांना थंड करण्यासाठी अधिकृत उमेदवारांबरोबरच राज्य पातळीवरील नेतेही प्रयत्न करत आहेत. मात्र काही बंडखोरांनी निवडणूक लढविण्याचा चंग बांधल्यामुळे वरिष्ठांच्या प्रयत्नांना यश येणार का? हा प्रश्न सध्या शहरात चर्चिला जात आहे.