सिरीसेना पडले शर्यतीतून बाहेर
कोलंबो: श्रीलंकेचे अध्यक्ष मैथ्रिपाल सिरीसेना दुसऱ्या कार्यकाळासाठी रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे श्रीलंकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीला रंगतदार वळण मिळाले आहे.
श्रीलंकन अध्यक्षपदाची निवडणूक 16 नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठी अनामत रक्कम भरण्याची मुदत रविवारी दुपारी संपली. सिरीसेना यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असणारी ती रक्कम न भरली नाही. त्यामुळे शर्यतीतून बाहेर पडण्याच्या त्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
त्यामुळे विद्यमान अध्यक्ष, पंतप्रधान किंवा प्रमुख विरोधी पक्षनेता रिंगणात नसणारी श्रीलंकेतील ही 1982 पासूनची पहिलीच अध्यक्षीय निवडणूक ठरली आहे. सिरीसेना, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आणि प्रमुख विरोधी पक्षनेते महिंदा राजपक्षे विविध कारणांवरून अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर राहिले आहेत.
सिरीसेना यांनी राजपक्षे यांचे बंधू गोतभाया यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सिरीसेना अध्यक्षपदावर असले तरी त्यांचा पक्ष विरोधी बांकावर आहे. तर विक्रमसिंघे यांचा पक्ष सत्तेत आहे. त्यांच्या पक्षाकडून अध्यक्षीय निवडणुकीसाठी साजिथ प्रेमदासा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 41 उमेदवार नशीब आजमावत आहेत. श्रीलंकेच्या इतिहासात उमेदवारांच्या संख्येचा तो विक्रम ठरला आहे.