निवडणूक विभागाकडून नोंदवह्यांचा आढावा
पिंपरी – विधानसभा निवडणुकीची रंगत आता वाढली असून प्रचाराचा पहिला टप्पाही उमेदवारांनी पूर्ण केला आहे. त्यानुसार, निवडणूक विभागानेही आता उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ लावण्यासाठी जागरणे सुरू केली आहेत. उमेदवारांना खर्चाची माहिती टिपण्यासाठी देण्यात आलेल्या नोंदवह्याची दि. 11 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती. उमेदवारांच्या खर्चाची तपासणी झाल्यानंतरच पहिल्या टप्प्यात कोणत्या उमेदवाराने किती खर्च केला याची माहिती समजणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये “कांटे की टक्कर’ होत आहे. त्यामुळे, या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महत्वपूर्ण असणाऱ्या या मतदारसंघामध्ये भाजप व शिवसेनेच्या उमेदवाराच्या व्यतिरिक्त इतर पक्षांची उमेदवारी जाहीर करण्यात राष्ट्रवादीने वेळ लावल्याने ऐनवेळी चिंचवड व भोसरीमध्ये पुरस्कृत उमेदवार आखाड्यात उतरवावे लागले. तर पिंपरीमध्येही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर करण्यात आली.
त्यामुळे, निवडणुकीच्या आखाड्यात उतरणाऱ्या उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला. त्यामुळे, पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारांनी प्रत्यक्ष उमेदवारांपर्यत पोहचण्याकडे भर दिल्याचे दिसून आले. पहिल्या टप्प्यातील प्रचार संपून आता दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, उमेदवारांनाही त्यांनी 11 ऑक्टोंबरपर्यंत केलेल्या खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगापुढे सादर करावा
लागणार आहे.
15 आणि 19 ऑक्टोबरला पुन्हा हिशोब – निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची टिपणे करण्यासाठी दिलेल्या नोंदवहीची तपासणी शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरु करण्यात आली. उमेदवारांनी नोंदवहीमध्ये लावलेला खर्च व निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण केलेल्या खर्चाचा ताळमेळ लावण्यात येत असून यामध्ये तफावत असल्यास ती उमेदवारांच्या प्रतिनिधींना निदर्शनास आणून दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील खर्चाची तपासणी आज झाल्यानंतर पुढील टप्प्यातील खर्चाची तपासणी दि. 15 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील खर्चाची तपासणी दि. 19 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.