बॅंक गैरव्यवहारात ग्राहकांची पिळवणूक थांबणार

सर्वसमावेशक कायदा लवकरच : केंद्रीय अर्थमंत्री सितारामन यांची माहिती

पुणे – गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेल्या को-ऑपरेटिव्ह बॅंकांवर आर्थिक निर्बंध लादले जातात. त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदार व खातेदारांना मन:स्ताप सहन करावा लागतो. यातून आता ग्राहकांची सुटका होण्यासाठी सर्वसमावेशक कायदा तयार करण्यात येत असून हिवाळी अधिवेशानात तो मंजूर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी येथे दिली.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सितारामण शुक्रवारी पुण्यात आल्या होत्या. यावेळी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. को-ऑपरेटिव्ह बॅंकांवरील कारभारावर राज्य सहकार विभाग देखरेख ठेवतो. त्यामुळे कायदा करताना प्रत्येक राज्यातील सहकार खात्याशी चर्चा करावी लागणार आहे. यासंदर्भात सध्या अभ्यास सुरू असून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तिचा अहवाल आल्यानंतर या कायद्यासंदर्भात मसुदा तयार केला जाईल, असे सितारामन म्हणाल्या.

गेल्या महिन्यात जीएसटी संकलन कमी झाले आहे. ही रक्कम का कमी झाली, याबाबत देशातून अभ्यास केला जात आहे. सर्व राज्यांतून अहवाल मागविण्यात आले आहेत. एक समितीसुद्धा याबाबतचा शोध घेत आहे. तर, ऑटोमोबाइल क्षेत्रात असलेल्या मंदीबाबत बोलताना सितारामन म्हणाल्या. ऑटो सेक्‍टरमधील प्रत्येक घटकाशी आमचे बोलणे सुरू आहे. जीएसटीसंदर्भात त्यांच्या काही अडचणी आहेत. त्या लवकरच सोडविल्या जातील. वाहन विक्री कमी झाली असली, तरी त्यांची कारणे वेगळी आहेत.

370 कलमाचा मुद्दा हा देशाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे. देशवासीयांच्या अस्मितेचा हा मुद्दा आहे.त्यामुळे महाराष्ट्रात त्याचे महत्त्व कमी आहे, असे समजणे योग्य नाही. त्याचबरोबर सध्याच्या औद्योगिक क्षेत्राला उभारी देण्यासाठी ज्या मदतीची आवश्‍यकता आहे, ती नक्कीच केंद्राकडून केली जाईल, असेही सितारामण म्हणाल्या.

पूरग्रस्तांच्या मदतीबाबत राजकारण नको
कोल्हापूर, सांगलीमध्ये पूरस्थितीत तेथील नागरिकांना केंद्राकडून जी तातडीने मदत देणे आवश्‍यक होते, ती देण्यात आली आहे. यापुढील काळात तेथील उद्योग-व्यवसायांना उभारी देण्यासाठी मदत दिली जाईल. राज्य शासनाने मदतीची मागणी केली आहे.त्याप्रमाणे नक्कीच मदत दिली जाईल, पण त्याचे राजकारण मात्र कोणी करू नये, मी कमी बोलते आणि काम जास्त करते, असेही सितारामण म्हणाल्या.

राफेलची पूजा ही सांस्कृतिक परंपरा
राफेल भारताच्या ताफ्यात दाखल करुन घेताना त्याची पूजा करण्यात आली तसेच लिंबू मिरची ठेवूनही पूजा करण्यात आली ही अंधश्रद्धा नाही तर आपली संस्कृती आहे. ज्यादिवशी राफेल दाखल झाले, त्यादिवशी विजयदशमी होती. यादिवशी आपण शस्त्रपूजन करतो. त्यामुळे याबाबत कोणीही गैरअर्थ काढू नये. आम्ही विज्ञानाचा सुद्धा तेवढाचा आदर करतो, तसेच संस्कृती परंपरा सुद्धा जपतो, असे ही सितारामन यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)