दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी चौघांना अटक

लखनौ – उत्तर प्रदेश पोलिसांनी दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. या चौघांना लखीमपूर जिल्ह्यातील निघसन परिसरातून गुरुवारी मध्यरात्री चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी दिली.

उम्मेद अली, संजय अग्रवाल, समीर सलमानी आणि आयराज अली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, या चौघांबाबत पोलिसांना खास खबर मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.

त्यांची चौकशी केली असता त्यांनी मुमताज, फहीम, सिराजुद्दिन आणि सदाकत अली अशी आपल्या साथीदारांची नावे सांगून त्यांच्या सूचनेनुसार काम करत असल्याचे सांगितले. या चौघांकडून नेपाळ आणि भारतीय चलनासह मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. ते इतर देशांमधून नेपाळमधील बॅंक खात्यात पैसे जमा करतात आणि खातेदारांना पाच टक्के कमिशन देत, असे ओ. पी. सिंग म्हणाले.

या कामासाठी त्यांना सहा टक्‍के कमिशन मिळत असे. कमिशन घेतल्यानंतर ते पैसे फहीम आणि सदाकत यांना देत असत. फहीम आणि सदाकत हे पैसे दिल्लीत पाठवत असत, तेथून भारतविरोधी कारवाईसाठी वापरला जात असे, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नेपाळ राष्ट्र बॅंकेची जनकपूर शाखा हॅक करून 49 लाखांची रक्‍कम भारतात आणल्याचे त्यांनी चौकशी वेळी सांगितले. या संदर्भात नेपाळमध्येही गुन्हा नोंद करण्यात आला असून नेपाळ पोलीसही चौकशी करत आहेत. तसेच हे प्रकरण दहशतवादाशी संबंधित असल्याने चौघांना पुढील चौकशीसाठी एटीएसकडे वर्ग करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.