कोपरगाव/नगर – कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील शिवसैनिक सुरेश शामराव गिर्हे यांची हत्या करणारे चौघे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. अटक करण्यात आलेले दोघे आरोपी हे सर्हाईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
आरोपी नितीन सुधाकर अवचिते (रा.तळेगाव स्टेशन, वाघेला पार्क, ता-मावळ, जि-पुणे), शरद मुरलीधर साळवे (रा.काळेवाडी फाटा, पिंप्री चिंचवड ता.हवेली जि.पुणे), रामदास माधव वलटे (रा.लौकी पोस्ट दहेगाव बोलका ता.कोपरगाव), आकाश मोहन गिरी (रा. खराबवाडी, खेड,जि,पुणे) याना ताब्यात घेण्यात आले आहे.
सुरेश शामराव गिर्हे व रवि आप्पसाहेब शेटे व त्याचे टोळीतील साथीदारांसोबत सुरेश गिर्हे हे रवि शेटे यांचे पुर्व वैमनस्य होते. या वैमनस्यातुनच वारंवार भांडणे होवुन त्यांचे एकमेकांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यातुनच 2012 मध्ये रवि शेटे व त्याचे साथीदारांनी सुरेश गिरे यांचा मित्र बंटी ऊर्फ विरेश पुंजाहरी शिनगर यांचा खुन केला होता. या गुन्ह्यामध्ये रवि शेटे व त्याचे इतर साथीदारांना जन्म ठेपेची शिक्षा झालेली आहे.
15 मार्च रोजी सायंकाळी पावने सात वाजता सुरेश गिर्हे हे त्यांचे राहते घरी भोजडे शिवारातील त्यांचे कुटूंबासह बसलेले असताना एक पांढरे रंगाची कार मधून अनओळखी चौघे व एक काळे रंगाची दुचाकीवरून रवि आप्पासाहेब शेटे, विजू खर्डे यांनी सुरेश गिरे यांना गोळ्या घालून ठार मारले. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचेकडे वर्ग करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील मुख्य आरोपी रवि शेटे याने सुमारे 15 दिवसांपासुन गुन्ह्याचा नियोजनबद्ध कट करुन तळेगाव (जि.पुणे) येथुन भाडोत्री मारेकरी आणुन गुन्हा केलेला असल्याचे समजले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, शिशीरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे यांच्या पथकाने आरोपी रवि शेटे व बिजू खर्डे याचे सोबत असलेले अनोळखी मारेकरी नितीन सुधाकर अवचिते, शरद मुरलीधर साळवे, रामदास माधव बलटे, आकाश गिरी यांना सापळा रचवून पुणे येथून ताब्यात घेतले. त्यातील दोघे आरोपी सर्हाईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
तालुक्याचे शिवसेना नेते सुरेश गिरे हत्या प्रकरणी मुख्य दोन आरोपी अद्याप फरार
तालुक्यातील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुरेश गिरे हत्या प्रकरणी मुख्य दोन आरोपी अद्याप हि फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे तर खुनामध्ये वापरण्यात आलेली चारचाकी गाडी ,हत्यारे पोलिसांना मिळाली आहेत.
गिरे यांची रविवारी दि १५ मार्च रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. त्यांचे वडीलानी रवी आप्पासाहेब शेटे, विजय खर्डे यांच्यासह चार अनोळखी आरोपी विरुद्ध फिर्याद दिली होती.त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्यात वापरलेले तीन कोयते पोलिसांच्या हाती लागले असून खुनात वापरलेली गाडी वैजापूर तालुक्यातील कीरतपूर शिवारातील एका शेताच्या रस्त्याच्या कडेला वस्तीवर गाडी बंद पडल्याने आरोपींनी ती सोडून दिली होती. वैजापूर पोलिसांच्या मदतीने सदर गाडी मंगळवारी कोपरगाव पोलिसांनी ताब्यात घेतली असता त्या गाडीची नंबर प्लेट काढून टाकलेली होती. परंतु पोलिसांनी संबधित गाडीच्या चेसी नंबर वरून गाडी मालकाचा शोध घेतला आहे. त्याला हि ताब्यात घेतले आहे.
तर गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, दोन पिस्तुल व मुख्य दोन आरोपी यांच्या शोधासाठी पोलीस पाच पथकासह विविध ठिकाणी रवाना झाले असून दोन्ही मुख्य आरोपींच्या नातेवाईकाना ताब्यात घेवून दररोज चौकशी सुरु आहे. तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाकोणाचा हात आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनोळखी आरोपींची नावे गुप्त ठेवली आहे अशी पोलीस वर्तुळात चर्चा सुरु आहे.