काठमांडू : नेपाळ विमान दुर्घटनेमध्ये पाच भारतीयांसह 72 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दुर्घटनेआधी विमानाचे नियंत्रण बिघडल्याचे दिसून येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नेपाळच्या पोखरा विमानतळाजवळ हा मोठा विमान अपघात होण्यापूर्वीच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ समोर आला आहे.
रविवारी या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. एटीआर-७२ हे प्रवासी विमान ७२ जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने रविवारी सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. या दुर्दैवी अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
The unfortunate video recording
#NepalPlaneCrash pic.twitter.com/gJ8Ix56wiV
— Akash Singh (@akki_gp) January 15, 2023
विमानातील एका भारतीय प्रवाशाने हा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. अपघात होण्यापूर्वी काही मिनिटं आधी त्याने हा व्हिडीओ सुरू केला होता. या व्हिडीओत अपघाताची संपूर्ण घटना कैद झाली आहे. सुरुवातीला विमान हलल्यानंतर थेट अपघातग्रस्त विमानाला लागलेली आग संबंधित व्हिडीओत दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेत अभिषेक कुशवाह (२५), सोनू जैस्वाल (३५), विशाल शर्मा (२२), संजय जैस्वाल (३५) आणि अनिल कुमार राजभर (२७) असे मृत पावलेल्या पाच भारतीय नागरिकांची नावे आहेत, याबाबतची माहिती विमानतळ प्रशासनाने आली. संबंधित सर्वजण उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि गाझीपूर येथील रहिवासी होते. या पाचपैकी चार भारतीय शुक्रवारीच भारतातून काठमांडूला पोहोचले होते. रविवारी त्यांचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे.