आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात मकर संक्रांतीनिमित्त महिलांनी एकमेकींना सुगड्याचं वाण देत हळदी-कुंकवाचा सण साजरा केला. महिलांनी माऊली मंदिरासह इंद्रायणी घाटावर एकत्र जमत संक्रांत साजरी केली. आळंदीत संक्रांती सण साजरा करण्याची महिला वर्गाची वेगळी परंपरा आहे. आपली माता इंद्रायणीच्या काठावर महिला जमतात. इंद्रायणी नदीच्या काठावरच महिला एकमेकिंना हळदी-कुंकू देऊन नदीलाही वाण अर्पण करतात.
रविवारी (दि. 15) मकर संक्रांतीनिमित्त आळंदीतील इंद्रयाणी नदीच्या काठावर महिलांनी याच पद्धतीने हा सण साजरा केला. यावेळी माऊली मंदिरासह इंद्रायणी घाटावर महिलांची हजारोंच्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. आळंदी इंद्रायणी घाट, ग्राम मंदिरामध्ये सुद्धा महिला भाविकांची गर्दी होती. यावेळी मकरसंक्रांत निमित्ताने तात्पुरत्या स्वरूपात, हलव्याची, लहान मुलांच्या खेळण्याची व महिलांसाठी दाग-दागिन्यांची दुकाने विविध ठिकाणी लावण्यात आली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
इंद्रायणी नदी घाटावर नदी पूजन आणि ओवसा वाहत ठिकठिकाणच्या मंदिरासमोरील मोकळ्या जागेत जाऊन महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू, तीळगूळ आणि सुगडीतील विविध साहित्याचे वाण देऊन या सणाचे औचित्य साधले. या दरम्यान काही महिला भाविकांना एक दिवस अगोदर मंदिरात येत “श्रीं’चे दर्शन घेतले. संक्रांतीनिमित्त माऊली मंदिरात प्रथा-परंपरांचे पालन करीत पूजा, आरती, हरिनाम आदी नित्याचे धार्मिक उपक्रम नेहमीप्रमाणे झाले.
सुहासिनींना माऊलींना ओवसण्यासाठी मंडपात पादुका ठेवून त्यावर ओवसा वाहण्याची व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाने केली होती, असे प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. महिलांचे दाग दागिने चोरीस जाऊ नये म्हणून मंदिरामध्ये विशेष महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.