पुणे : खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच असून खडकवासल्या पाठोपाठ पानशेत धरणही शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. रात्रीपासून खडकवासला धरणातून 15 हजार क्यूसेक सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आज दुपारी सुमारे 17 हजार करण्यात आला आहे. यामुळे मुठा नदीचे पाणी पात्राबाहेर वाहत असून विठ्ठलवाडी येथील भक्त पुंडलिक मंदिर अर्धे पाण्याखाली गेले आहे.
दरम्यान, पानशेत मधून पाणी सोडावे लागणार असल्याने खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. तर खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा 26 टीएमसी झाला असून मागील वर्षी पेक्षा 1 टीएमसी आधिक पाणी आहे. डेक्कन येथील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.