जिल्ह्यातील दोन टोळ्या तडीपार

सातारा – सातारा जिल्ह्यातील उंब्रज व सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन टोळ्या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या टोळ्यांच्या विरोधात दारूची अवैध विक्री तसेच घरफोडी, मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन टोळ्यातील एकूण सहाजणांच्या तडीपारीचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. चेतन प्रदीप सोलंखी (रा.सदरबझार,सातारा) चंदन माणिक वाघ (रा. चाहूर, सातारा) भानुदास भितांडे (रा. जाळगेवाडी, ता.पाटण) सागर शंकर गायकवाड (रा.काशिद गल्ली, उंब्रज) सोन्या उर्फ शाहिद शबिर मुल्ला (रा.उंब्रज) रोषण अरविंद सोनावले (रा.उंब्रज) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, चेतन प्रदीप सोलंखी (रा.सदरबझार, सातारा) चंदन माणिक वाघ (रा. चाहूर, सातारा) या दोघांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात बेकायदेशीर दारू विकणे व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. हे दोघेही सातारा शहर परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच भानुदास भितांडे (रा.जाळगेवाडी,ता.पाटण) सागर शंकर गायकवाड (रा.काशिद गल्ली,उंब्रज) सोन्या उर्फ शाहिद शबिर मुल्ला (रा.उंब्रज) रोषण अरविंद सोनावले (रा.उंब्रज) यांच्याविरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात घरफोडी, मारामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही टोळ्यांच्या सदस्यांनी आपाआपल्या परिसरात दहशत निर्माण करून सामान्य लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांच्याविरोधात वेळोवेळी लोकांच्या तक्रारी आल्याने पोलीसांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली होती. मात्र त्यांच्या वागण्यात काही बदल होत नव्हता.

लोकांच्या वाढत्या तक्रारींचा विचार करून व आगामी काळात कोणतीही सामाजिक हानी संबंधिताकडून निर्माण होऊ नये यासाठी अनुक्रमे सातारा शहर व उंब्रज पोलीसांनी हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस प्रमुक तेजस्वी सातपुते यांच्याकडे हद्दपारीचे प्रस्ताव पाठवले होते. त्यानुसार सातपुते यांनी या दोन्ही टोळ्यांना सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी तडीपार केले आहे. जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या, मारामारी तसेच कोणत्याही प्रकारे सामाजिक शांततेचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.