भारतीय महिलांचा विजय

सेंट ल्युसिका: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत भारताच्या महिला क्रिकेट संघाने 10 गडी राखून मोठा विजय मिळविला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. एकदिवसीय सामन्यांची मालिका यापूर्वीच भारताने जिंकली असून याही मालिकेत वर्चस्व राखण्यासाठी भारताला एका विजयाची आवश्‍यकता आहे.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. सलामीची जोडी लवकर बाद झाल्यानंतर हॅले मॅथ्यूज आणि शेडन नेशन यांनी संघाचा डाव थोडाफार सावरण्याचा प्रयत्न केला. मॅथ्यूजने 23 धावा केल्या. नेशनने 32 धावा केल्या. अन्य फलंदाजांना दोन आकडी धावा देखील करता आल्या नाहीत. त्यामुळे वेस्ट इंडिजचा डाव 7 बाद 103 धावांवर थांबला.

ऑफस्पिनर दीप्ती शर्माने 10 धावांत 4 बळी मिळविताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. विजयासाठी आवश्‍यक 104 धावा भारतीय संघाने एकही गडी न गमावता पुर्ण केल्या. भरात असलेली सलामीची जोडी शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी भारताला विजय मिळवून दिला.

शेफालीने 35 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार फटकावत नाबाद 69 धावा केल्या तर, मानधनाने 28 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 30 धावा केल्या. या दोघींनी 11 व्या षटकातच संघाला 10 गडी राखून विजय मिळवून दिला. दीप्ती शर्मा सामन्याची मानकरी ठरली.

Leave A Reply

Your email address will not be published.