वेस्ट इंडिजचा अफगाणिस्तानला व्हाईटवाॅश

लखनौ : भारतामध्ये झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील तिस-या आणि अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने ही मालिका ३-० अशी जिंकत अफगाणिस्तानला व्हाॅईटवाॅश दिला आहे. विंडीजला तब्बल पाच वर्षांनी एकदिवसीय मालिका जिंकण्यात यश आले आहे.

लखनौमधील एकाना स्टेडियमवर अखेरचा सामना झाला. विंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २४९ धावांपर्यत मजल मारली. अफगाणिस्तानकडून असगर अफगानने ८५ चेडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह सर्वाधिक ८६ धावा केल्या. मोहम्मद नबीने नाबाद ५० धावा केल्या. वेस्टइंडिजकडून गोलंदाजीत कीमो पाॅलने ३, अलजारी जोसेफने २ तर रोमरियो शेफर्ड व राॅसटन चेंजने प्रत्येकी १ गडी बाद केला.

यानंतर विजयासाठीचे २५० धावांचे लक्ष्य ५ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. विंडीजकडून सलामीवीर शाइ होपने १४५ चेंडूत ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १०९ धावा करत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. या कामगिरीबदल शाइ होप सामनावीर ठरला. याशिवाय राॅसटन चेजने नाबाद ४२ धावा तर ब्रैडन किंगने ३९, कायरन पोलार्डने ३२ आणि निकोलस पूरनने २१ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान याने २ तर शरफुद्दीन अशरफ, मोहम्मद नबी आणि राशिद खानने प्रत्येकी १ गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.