हिंगोली – रस्त्यावरील खड्ड्यामुळे तेथून वाहनाने जाणाऱ्या जवानाच्या बंदुकीची गोळी सुटली आणि याच गोळीने जवानाचा प्राण घेतल्याची विचित्र घटना या जिल्ह्यातील डोंगरकडा ते नांदेड या रस्त्यावर घडली. या घटनेत सशस्त्र सीमा दलाचे कॉन्स्टेबल पप्पाला भानुप्रसाद यांना जीव गमवावा लागला आहे. ते 35 वर्षांचे होते व ते मुळचे आंध्रप्रदेशातील रहिवासी होते.
ते ड्युटीवर होते व ते दलाच्याच गाडीतून पहाटे साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमाराला हैदराबादहून नांदेडला येणाऱ्या एका डॉक्टरांना आणण्यासाठी तिकडे निघाले होते. डोंगरकडा गावाजवळ तीन किमी अंतरावर हा प्रकार घडला. तेथे रस्त्याची कामे सुरू आहेत.
त्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. त्या रस्त्यातून त्यांची गाडी जात असताना जवानाजवळ असलेल्या इंसास रायफलीला खड्ड्यामुळे हादरा बसला आणि त्यातून गोळी सुटली. या गोळीने जवानाचा वेध घेतला व ते जागीच गतप्राण झाले. या घटनेमुळे नागरीकांनी हळहळ व्यक्त केली आहे.