ऍटलांटा – अमेरिकेच्या गजबजलेल्या ऍटलांटा विमानतळावर मुख्य सुरक्षा चेकिंग पॉईन्टवर एका प्रवाशाची बॅग तपासताना त्यात एक बंदुक आढळून आली. ती सुरक्षा जवानांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यातून अचानक एक गोळी उडाली. त्यामुळे या विमानतळावर प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. त्या गोंधळामुळे तीन जण जखमी झाल्याचाही प्रकार घडला. गोळीबाराचा आवाज ऐकून काही प्रवासी तातडीने प्रवेशद्वाराकडे धावले आणि त्यांनी विमानतळाच्या मुख्य इमारतीच्या बाहेर पळ काढला.
विमानतळावर कोणताही गोळीबार झालेला नाही, जी बंदुकीची एक गोळी सुटली तो केवळ एक अपघात होता. त्यामुळे प्रवाशांनी गोंधळून जाऊ नये, असे आवाहन सुरक्षा अधिकाऱ्यांनी केले. अमेरिकेत सध्या थॅंक्स गिव्हींग कार्यक्रमासाठी लोकांना सुट्टी सुरू झाली आहे. त्यामुळे तेथील विमानतळांवर सध्या प्रवाशांची गर्दी सुरू आहे. त्यातच हा प्रकार घडल्याने अनेकांची विमानेही चुकण्याचा प्रकार घडला आहे. हे गोंधळाचे वातावरण शांत होण्यास सुमारे दोन तास लागले.