पुणे – ढगाळ वातावरण आणि हवेतील गारव्यामुळे शहरात दिवसभर थंडी जाणवत आहे. तसेच पुढील दोन दिवस पावसाची भुरभुर तर काही भागात अति हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
मागील चार दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे. मात्र, उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे आणि अधिक आर्द्रतेमुळे पुणे शहरासह जिल्ह्यात थंडीचे प्रमाण जाणवत आहे. दरम्यान, दि. 9 जानेवारीपर्यंत शहरात भुरभुर तर अतिहलका पाऊस पडेल. 6 जानेवारीपासून किमान व कमाल तापमानात घट होणार असल्याने दिवसभर थंडी जाणवेल. तर 10 जानेवारीनंतर शहरातील ढगाळ वातावरण कमी होईल, आकाश निरभ्र राहील.
राज्यात मेघगर्जनेसह हलका पावसाची शक्यता
आर्द्रता मोठ्या प्रमाणात येत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण आहे. कमी दाबाची एक रेष लक्षद्वीपपासून उत्तर कोकणापर्यंत जात असून, वायव्य दिशेकडून येणारे गार वारे, बंगालच्या उपसागराच्या अग्नेय दिशेने येणारे वारे यामुळे पुढील चार दिवस राज्यात हलका ते अति हलका पाऊस पडेल. विदर्भ आणि मराठवड्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.